तब्बल ३००च्या स्ट्राइक रेटनं महेंद्रसिंग धोनीने चेन्नई संघाला नेलं अंतिम फेरीत

IPL 2021
भरत जाधव
Updated Oct 11, 2021 | 09:05 IST

आयपीएल २०२१ स्पर्धेत प्लेऑफच्या सामन्यात चेन्नईने दिल्लीला ४ गडी आणि २ चेंडू राखून पराभूत केलं. या विजयासह चेन्नईने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

Mahendra Singh Dhoni led Chennai to the final
तब्बल ३००च्या स्ट्राइक रेटनं धोनीने फिरवला सामना   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • दिल्लीने चेन्नईसमोर विजयसाठी १७३ धावांचं आव्हान ठेवलं होतं.
  • चेन्नईच्या फलंदाजांनी चार विकेट्स आणि 2 चेंडू राखून दिल्लीचं आव्हान पूर्ण केलं.

नवी दिल्ली : आयपीएल २०२१ स्पर्धेत प्लेऑफच्या सामन्यात चेन्नईने दिल्लीला ४ गडी आणि २ चेंडू राखून पराभूत केलं. या विजयासह चेन्नईने अंतिम फेरीत धडक मारली आहे. दिल्लीने चेन्नईसमोर विजयसाठी १७३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान चेन्नईने ६ गडी गमवत १९ षटकं आणि ४ चेंडूत पूर्ण केलं. या विजयासह चेन्नईने आयपीएल इतिहासात नवव्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे.

आतापर्यंत चेन्नईने आयपीएलचे ३ चषक आपल्या नावावर केले आहेत. मागील वर्षी २०२० मधील आयपीएल सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा संघ सातव्या स्थानी राहत आयपीएलच्या शर्यतीमधून बाहेर पडला होता. त्यावेळी महेंद्रसिंग धोनीने म्हटलं होतं की, आमचा संघ परत वापसी करणार. आता परत धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नईचा संघ अंतिम फेरीत पोहचला आहे. 

काल झालेल्या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 172 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र चेन्नईच्या फलंदाजांनी चार विकेट्स आणि 2 चेंडू राखून हे आव्हान पूर्ण केलं आहे. सुरुवातीला ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पाने या सामन्यात शतकी भागिदारी करत चेन्नईच्या विजयाचा पाया रचला. अखेरच्या षटकात धुवांधार फलंदाजी करत कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्यावर कळस चढवला. या सामन्यात शेवटच्या दोन षटकात कोण बाजी मारेल?, अशी स्थिती असताना चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची बॅटने परत एकदा आपला करिष्मा दाखवला. धोनीने तब्बल ३०० च्या स्ट्राईक रेटने म्हणजेच ६ चेंडूत १८ धावा केल्या. या खेळी ३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. महेंद्रसिंह धोनीने शेवटच्या षटकात ३ चौकार ठोकत दिल्लीला ४ गडी आणि २ चेंडू राखून मात दिली. मोक्याच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे धोनीने चेन्नईला अंतिम फेरीत पोहोचवले. विशेष म्हणजे धोनीने त्याच्या स्टाईलमध्ये फिनिशिंग टच देत विजयी चौकार मारला.

धोनीची फिनिशिंग स्टाईल पाहून विराट कोहलीनेही त्याच कौतुक केले आहे. विराटने धोनीचं कौतुक करणारं ट्विट देखील केलं आहे. विराट आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला, ”आणि राजा परत आला आहे. गेममधील आतापर्यंतचा सर्वात मोठा फिनिशर. आज पुन्हा एकदा मला माझ्या जागेवर उडी मारता आली.” विराटने आपल्या ट्वीटमधून धोनीला सर्वोत्तम फिनिशर म्हणत रोमाचंक सामन्याचा अनुभव घेता आल्याचे सांगितले.  विराट कोहलीचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे. 

आयपीएलमधील चेन्नईचा आतापर्यंतचा प्रवास

२००८- चेन्नई सुपर किंग्स- अंतिम फेरीत पराभूत
२०१०- चेन्नई सुपर किंग्स- विजयी
२०११- चेन्नई सुपर किंग्स- विजयी
२०१२- चेन्नई सुपर किंग्स- अंतिम फेरीत पराभूत
२०१३- चेन्नई सुपर किंग्स- अंतिम फेरीत पराभूत
२०१५- चेन्नई सुपर किंग्स- अंतिम फेरीत पराभूत
२०१८- चेन्नई सुपर किंग्स- विजयी
२०१९- चेन्नई सुपर किंग्स- अंतिम फेरीत पराभूत
२०२१- अंतिम फेरीत

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी