IPL 2021: कोविडमुळे आजचा सामना रद्द; केकेआरच्या वरूण आणि संदीपला कोरोनाची लागण

IPL 2021
भरत जाधव
Updated May 03, 2021 | 15:47 IST

IPL 2021 Covid cancels match । आयपीएल २०२१ स्पर्धेत आज कोलकाता नाइटराइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार होता.

IPL 2021 Covid cancels match
IPL 2021: कोविडमुळे आजचा सामना रद्द  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कोविडमुळे सामना रोखण्यात आला आहे
  • आयपीएलच्या ३० वा सामना कोलकाता नाईट राइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये होणार होता
  • केकेआरच्या संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : आयपीएल २०२१ स्पर्धेत आज कोलकाता नाइटराइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार होता. मात्र या सामन्यापूर्वी दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने भीतीचं वातावरण पसरले आहे असून आजचा सामना रद्द करण्यात आला आहे. या वर्षाचा आयपीएल हंगाम कोरोनाच्या सावटाखाली होत असल्याने खेळाडू बायो बबलमध्ये खेळत आहेत. तसेच कडक नियमावली लागू करण्यात आली. अशात खेळाडूंना कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरीयर या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला याबाबतची माहिती दिली आहे. ‘कोलकाता संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बंगळुरुचे खेळाडू त्यांच्याविरोधात मैदानात उतरण्यास तयार नाही. वरुण आणि संदीपची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आजचा सामना पुढे ढकलण्याची शक्यता आहे’, असं एएनआयला बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. दोन्ही संघातील हा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार होता. 

कोरोनाच्या संकटामुळे अनेक खेळाडू स्पर्धा सोडत आहेत.मागच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचा अॅड झम्पा, केन रिचर्डसन आणि अँड्र्यू टाय यांनी मायदेशी परतले आहेत. त्यानंतर घरच्यांना कोरोनाची लागण झाल्याने आर. अश्विनने स्पर्धेतून माघार घेतली आहे. आयपीएलच्या सुरुवातीपासूनच खेळाडू कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. स्पर्धेपूर्वी दिल्लीचा अक्षर पटेल, कोलकाताचा नितीश राणा आणि बंगळुरुचा देवदत्त पडिक्कल याला कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्यानंतर संघात पुनरागमन केले आहे. त्याचबरोबर वानखेडे मैदानातील १० कर्मचारी आणि बीसीसीआयने स्पर्धेसाठी नेमणूक केलेल्या ६ सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी