मुंबईः आयपीएल १४च्या उर्वरित ३१ सामन्यांबाबत पुढील निर्णय घेण्यासाठी तसेच टी २० वर्ल्डकप संदर्भातल्या निर्णयासाठी बीसीसीआयची उद्या म्हणजेच शनिवार २९ मे २०२१ रोजी विशेष बैठक होणार असल्याचे वृत्त आहे. या बैठकीत आयपीएल १४ आणि टी २० वर्ल्डकप संदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना द्यायच्या पैशांबाबतही याच बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी आज (शुक्रवार २८ मे २०२१) बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली मुंबईत दाखल होणार आहेत. T20 WC: BCCI Special General Meeting to be held tomorrow
कोरोना संकटामुळे स्थगित केलेल्या आयपीएलच्या उर्वरित मॅच १८ किंवा १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळवून स्पर्धा १० ऑक्टोबरपर्यंत संपवण्याबाबत बीसीसीआय विचार करत आहे.
भारतात आयपीएलच्या चौदाव्या सीझनच्या मॅच सुरू होत्या. पण काही संघांच्या सदस्यांना कोरोना झाल्याचे लक्षात आले. पुरेशी खबरदारी घेऊनही कोरोनाचा प्रार्दुभाव झाल्यामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली. स्थगित करेपर्यंत आयपीएलच्या २९ मॅच झाल्या होत्या. प्ले ऑफ, क्वालिफायर, एलिमिनेटर आणि फायनल या सर्व फेऱ्यांच्या मिळून ३१ मॅच खेळायच्या बाकी होत्या. पॉइंट्स टेबलमध्ये दिल्ली (१२ गुण) पहिल्या, चेन्नई (१० गुण) दुसऱ्या, बंगळुरू (१० गुण) तिसऱ्या, मुंबई (८ गुण) चौथ्या, राजस्थान (६ गुण) पाचव्या, पंजाब (६ गुण) सहाव्या, कोलकाता (४ गुण) सातव्या आणि हैदराबाद (२ गुण) आठव्या स्थानावर अशी स्थिती होती.