नवी दिल्ली : देशासह राज्यात थैमान घातलेल्या कोरोनाने आता आयपीएलच्या मैदानात प्रवेश केला आहे. कोलकाता नाइटरायडर्सच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने आजचा सामना रद्द करण्यात आला. त्यातच आता सीएसकेच्या तीन महत्त्वाच्या व्यक्तींची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे खेळ असाच चालू राहील असं म्हणणाऱ्या बीसीसीआय पुढे संकट उभे राहताना दिसत आहे. दरम्यान चेन्नईचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक एल बालाजी आणि बस क्लिनरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. रविवारी केलेल्या कोविड चाचणीनंतर हा अहवाल आला असून बाकीच्या संघातील लोकांची चाचणी ही निगेटिव्ह आली आहे.
दरम्यान, ज्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यांचा अहवाल चुकीचा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यासाठी विश्वनाथन, बालाजी आणि देखभाल कर्मचाऱ्याच्या सदस्यांनी आज परत एकादा चाचणी केली आहे. जर त्यांच्या चाचणीचा अहवाल परत पॉझिटिव्ह आला तर त्यांना टीम बबलच्या बाहेर नियुक्त केलेल्या ठिकाणी नियमाप्रमाणे १० दहा दिवस घालावे लागतील. परत संघात येण्यासाठी कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असावा लागेल.
बालाजी, हा भारतीय संघाचा माजी गोलंदाज आहे, शनिवारी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात सीएसकेचा पराभव झाला त्यावेळी बालाजी संघाच्या डगऑऊटमध्ये होता. दरम्यान सीएसकेचा पुढचा सामना हा राजस्थान रॉयल्सच्या विरुद्धात असून हा सामना ५ मे ला होणार आहे.दरम्यान, सुपर किंग्जला टीम बबलमध्ये कोरोनाचा उद्रेक होण्याची ही दुसरी वेळ आहे. युएईमध्ये आयपीएल २०२० मध्ये विश्वनाथनची पत्नी, दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाडला कोरोनाची लागण झाली होती.
या वर्षाचा आयपीएल हंगाम कोरोनाच्या सावटाखाली होत असल्याने खेळाडू बायो बबलमध्ये खेळत आहेत. तसेच कडक नियमावली लागू करण्यात आली. अशात खेळाडूंना कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरीयर या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.