कोलकाता: बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसन याने जाहीरपणे मुस्लिमांची माफी मागितली. माफी मागण्यासाठी शाकिबने स्वतःच्या यू ट्युब चॅनवर एक व्हिडीओ अपलोड केला. या व्हिडीओद्वारे शाकिबने कोलकाता येथे कालीमातेच्या दर्शनासाठी गेल्याप्रकरणी माफी मागितली. (Bangladesh all-rounder Shakib Al Hasan apologises for 'visiting' Kolkata's Kali Puja)
शाकिब अल हसन मागच्या आठवड्यात कोलकाता येथे कालीमातेच्या पूजेला उपस्थित होता. या घटनेची माहिती जाहीर झाल्यानंतर बांगलादेशमधील मूलतत्ववादी (कट्टर अथवा कडव्या विचारांचे) मुस्लिमांनी नाराजी व्यक्त केली. शाकिबला धमक्या येऊ लागल्या. हे प्रकरण चिघळत असल्याचे पाहून शाकिबने माफी मागून विषय संपवण्याचा प्रयत्न केला.
'मी पूजेच्या ठिकाणी जेमतेम दोन मिनिटे उपस्थित होतो. मान्यवरांच्या विनंतीचा मान राखत मी मेणबत्तीने दिप प्रज्वलन केले. पण पूजा केली नाही. एक सच्चा मुस्लिम म्हणून मी हे करायला नको होते. मी तिथे जाऊन चूक केली असे जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी मी माफी मागतो. कृपया मला माफ करा'; अशा शब्दात शाकिब अल हसन याने माफी मागितली.
शाकिब रस्ते मार्गाने सीमा पार करुन बांगलादेशमधून भारतात आला होता. त्याने बांगलादेशची सीमा बेनापोल (Benapole) येथील तपासणी नाका (Check Point or Check Naka) ओलांडत पार केली आणि पश्चिम बंगालमधील पेत्रापोल (Petrapole) येथे प्रवेश केला. तिथून तो थेट कोलकाता येथे कालीमातेच्या मंडपात पोहोचला होता. परतीच्यावेळी बेनापोलमध्ये प्रवेश करत असताना तपासणी नाक्याजवळ एका व्यक्तीने शाकिबला बघितले आणि फोटोसाठी आग्रह धरला. स्वतःच्या मोबाइलमध्ये त्याला आपल्योबत उभ्या असलेल्या शाकिबचा सेल्फी हवा होता. पण लवकर घरी परतायचे या विचाराने शाकिबने फोटोसाठी नकार दर्शवत पटकन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. शाकिबचा इशारा न समजल्याने अथवा फोटोसाठी प्रचंड उत्सुक असल्यामुळे बांगलादेशी नागरिकाने शाकिबला थांबवण्याचा प्रयत्न केला. ही कृती खटकल्यामुळे संतापलेल्या शाकिबने हाताच्या धक्क्याने मोबाइल उडवला आणि तो वेगाने निघून गेला. शाकिबच्या या कृतीमुळे फोटो काढू इच्छिणाऱ्या बांगलादेशी नागरिकाचा मोबाइल जमीनीवर आपटून फुटला आणि त्याचे नुकसान झाले. संतापलेल्या या नागरिकाने सोशल मीडियावर ही माहिती प्रसिद्ध केली आणि शाकिब भारतात थोड्या वेळासाठी येऊन गेल्याचे उघड झाले. यानंतर शाकिब कालीमातेचे दर्शन घेण्यासाठी आला होता हा गौप्यस्फोट सोशल मीडियावर झाला आणि नव्या वादाला तोंड फुटले.
मुस्लिम असून शाकिब अल हसन कालीमातेच्या दर्शनाला कसा जाऊ शकतो, असा प्रश्न काही मूलतत्ववाद्यांनी उपस्थित केला. शाकिबला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. बांगलादेशमधील मोहसिन तालुकदर (Mohsin Talukder) याने फेसबुक लाइव्ह केले आणि मुस्लिमांची मने दुखावणाऱ्या शाकिबचे तुकडे तुकडे करेन अशी धमकी दिली. हा व्हिडीओ व्हायरल झाला. फेसबुकने नंतर हा व्हिडीओ काढून टाकला, पण तो पर्यंत वातावरण आणखी तापले. प्रकरण वाढत असल्याचे पाहून शाकिबने कोलकाता येथे कालीमातेच्या दर्शनासाठी गेल्याप्रकरणी माफी मागितली.
बांगलादेशचा क्रिकेटपटू शाकिब अल हसन याने कोलकाता येथे येऊन कालिमातेचे दर्शन घेतल्याप्रकरणी माफी मागण्याची गरज नव्हती. शाकिबने माफी मागितल्यामुळे मूलतत्ववाद्यांचे महत्त्व आणखी वाढले, असे मत प्रसिद्ध लेखिका तसलिमा नसरीन यांनी व्यक्त केले.