हरभजन सिंह क्रिकेटमधून निवृत्त, २३ वर्षांच्या कारकिर्दीची अखेर

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 24, 2021 | 17:25 IST

Harbhajan Singh Announces Retirement : दिग्गज भारतीय फिरकीपटू हरभजन सिंह याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. हरभजन २३ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.

थोडं पण कामाचं
  • हरभजन सिंह क्रिकेटमधून निवृत्त, २३ वर्षांच्या कारकिर्दीची अखेर
  • १७ वर्षांचा असताना कारकिर्दीची सुरुवात करणारा हरभजन सिंह आता ४१ वर्षांचा आहे
  • ट्वीट करुन निवृत्तीची घोषणा केली असली तरी पुढील योजना जाहीर केलेली नाही

Harbhajan Singh Announces Retirement : नवी दिल्ली : दिग्गज भारतीय फिरकीपटू हरभजन सिंह याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. हरभजन २३ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. त्याने १९९८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. उण्यापुऱ्या १७ वर्षांचा असताना कारकिर्दीची सुरुवात करणारा हरभजन सिंह आता ४१ वर्षांचा आहे.

हरभजनने १९९८ मध्ये चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नंतर त्याने न्यूझीलंड विरुद्ध एक दिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हरभजनने २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी २० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 

हरभजन सिंहने २०१५ पर्यंत १०३ कसोटी सामन्यांत ४१७ विकेट घेतल्या. तसेच दोन शतके झळकावली आणि २ हजार २२४ धावा केल्या. त्याने २३६ वन डे खेळून २६९ विकेट घेतल्या आणि १ हजार २३७ धावा केल्या. टी २० क्रिकेटमध्ये हरभजनने २८ मॅच खेळून २५ विकेट घेतल्या. 

कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये हरभजन सिंह तिसऱ्या स्थानावर आहे. अनिल कुंबळे पहिल्या आणि आर. अश्विन दुसऱ्या स्थानी आहे. आयपीएलमध्ये हरभजन चेन्नई सुपरकिंग्स, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्याकडून खेळला. हरभजनने आयपीएलमध्ये १५० विकेट घेतल्या. 

क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा हरभजन लवकरच काँग्रेस पक्षाकडून पंजाबच्या राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांनी हरभजनची भेट घेतली होती. ही भेट झाल्यापासूनच हरभजन राजकारणात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण हरभजनने अद्याप राजकारणात जाणार असल्याचे संकेत दिलेले नाही. हरभजन एखाद्या आयपीएल टीमसाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करणार असल्याचीही चर्चा आहे. पण हरभजनने निवृत्तीनंतर काय करणार हे अद्याप जाहीर केलेले नाही. त्याने ट्वीट करुन निवृत्तीची घोषणा केली असली तरी पुढील योजना जाहीर केलेली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी