मुंबई: रविवारी आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात इंग्लंडच्या मँचेस्टर येथे ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात एक हाय वोल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतासहित जगभरातील क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. मात्र सामन्याआधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ भारत-पाकिस्तान सामन्याबाबत व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल करण्यात आला होता. यात भारत-पाकिस्तान सामन्याबाबत भारतीय क्रिकेट संघ आणि विंग कमांडर अभिनंदन यांची खिल्ली उडवण्यात आली होती. आता याचे प्रत्युत्तर म्हणून व्ही सेव्हन नावाच्या यूट्यूब चॅनेलने व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडीओत दाखवण्यात आले की भारतीय क्रिकेट टीमची जर्सी घातलेला एक व्यक्ती बार्बरच्या दुकानात बसून २००७मधील वर्ल्डकपमधील युवराज सिंग इंग्लंडविरुद्ध सलग सहा षटकार लगावतानााच सामना बघत आहे.
या दरम्यान पाकिस्तानच्या एका चाहत्याची एंट्री होते. यावेळी तो भारतीय चाहत्याला एक रुमाल गिफ्ट म्हणून देतो आणि म्हणतो ठेवून घ्या हरल्यानंतर तोंड लपवण्यासाठी उपयोगी येईल. यासोबतच पाकिस्तानचा चाहता म्हणतो की क्रिकेट हा बेभरवशाचा खेळ आहे यात एका दिवसात बेटा बाप बनू शकतो.
यानंतर पाकिस्तानचा चाहता न्हाव्याला आपली दाढी करण्यास सांगतो. यावेळी तो न्हावी त्याच्या दाढीचा शेप विंग कमांडर अभिनंदन यांच्याप्रमाणे करतो. यामुळे तो पाकिस्तानी चाहता नाराज होतो. यानंतर भारतीय चाहता पाकिस्तानी क्रिकेट संघाची जर्सी घातलेल्या त्या फॅनला सांगतो की ही आमच्या हिरोची स्टाईल आहे.
भारतीय फॅन त्यालाच पुन्हा रुमाल देतो आणि म्हणतो, हे ठेवून घे हरल्यानंतर तुम्हाला तोंड लपवण्यासाठी कामी येईल. क्रिकेट हा खूपच मजेदार खेळ आहे आणि एकाच दिवसात बाप आपल्या मुलाला समजावतो की तुमच्या नशिबात वर्ल्डकप नाही तर केवळ अभिनंदनाचा खोटा कप आहे. या व्हिडिओआधी पाकिस्तानकडून असाच काहीसा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला होता ज्यात भारताची खिल्ली उडवण्यात आली होती.