VIDEO: मतदान असं करं, अर्जुन तेंडुलकरला आईने समजवलं!

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 29, 2019 | 23:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

Arjun Tendulkar Voting: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आज सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पहिल्यांदाच सारा तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर यांनी मतदान केलं.

sachin_ANI
VIDEO: मतदान असं करं, अर्जुन तेंडुलकरला आईने समजवलं!  |  फोटो सौजन्य: ANI

मुंबई: महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुकीचा चौथा आणि शेवटचा टप्पा पार पडला. हा टप्पा सर्वच राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. कारण की, मुंबईसह एकूण १७ मतदारसंघात आज मतदान झालं. यावेळी मुंबईत अनेक सेलिब्रिटींनी अतिशय उत्साहात मतदान केलं. पण यावेळची एक खास गोष्ट म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या दोन्ही मुलांनी मतदार म्हणून 'पदार्पण' केलं आहे. म्हणजे सचिनची कन्या सारा आणि मुलगा अर्जुन यांनी पहिल्यांदाच आपल्या मतदानाचा हक्क बजावला. आता पहिलं मतदान म्हटलं की, सगळ्यांना थोडीशी धाकधाकू असतेच. तशीच धाकधूक या दोन्ही भाऊ-बहिणींच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. यावेळी अर्जुन तर काहीसा भांबावलेला देखील दिसून आला. त्यामुळे त्याचा मदतीला त्याची आई अंजली धावून गेली. 

पहिलंच मतदान... त्यामुळे ती प्रक्रिया कशी असेल काय करावं लागेल याबाबत अर्जुन हा अनभिज्ञच होता. त्यामुळे मतदान नेमकं कसं करावं हे त्याला ठाऊक नव्हतं. अखेर मतदान केंद्रामध्येच अंजली तेंडुलकरने त्याला मतदानाची नेमकी प्रकिया समजावून सांगितली. पण हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात मात्र कैद झाला. त्यानंतर स्वत: अर्जुनने पुढील सगळ्या गोष्टी आईकडून समजून घेत आपलं मतदान पार पाडलं. त्यानंतर त्याचा चेहऱ्याही काहीसा खुलला होता. खुलणारच म्हणा कारण पहिलं मतदान हे प्रत्येकासाठी खासच असतं. तसंच ते अर्जुनसाठीही खास होतं. 

दरम्यान, अर्जुनसोबतच सारानेही पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. सारा ही आता २१ वर्षांची आहे. तर अर्जुन हा १९ वर्षांचा आहे. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत दोघांनाही मतदान करता आलं नव्हतं. त्यामुळे दोघांनीही आज पहिल्यांदाच मतदान केलं. मतदानानंतर सचिन, अंजली, सारा आणि अर्जुन यांनी मीडियासाठी खास पोझ दिली. 

मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना सचिन म्हणाला की, 'प्रत्येक नागरिकांने मतदान केलं पाहिजे. कारण ते देशासाठी महत्त्वाचं आहे. सारा आणि अर्जुनने पहिल्यांदाच मतदान केलं. मी म्हटलं होतं की, अंजलीसोबत मी माझ्या दोन्ही मुलांना मतदानासाठी घेऊन येईन. तर आम्ही आलो आणि मतदान केलंही आहे. आपणही आपल्या घरातून बाहेर पडा.' यावेळी सचिनने खास मराठीतून मतदारांना आवाहन केलं होतं. 

दरम्यान, आज महाराष्ट्रासह, राजस्थान, उत्तर प्रदेश, प. बंगाल, मध्य प्रदेश, ओदिशा, बिहार आणि झारखंड यांच्यासह ९ राज्यात ७२ जागांसाठी मतदान पार पडलं. महाराष्ट्रात आज सर्वाधिक म्हणजे १७ जागांसाठी मतदान पार पडलं. या निवडणूक प्रकियेत देशातील अनेक मोठ्या उद्योजकांपासून, कलाकार, खेळाडू आणि सामान्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी