Times Now Summit 2021: बायोपिकविषयी 'हे' म्हणाले नीरज आणि श्रीजेश

Times Now Summit 2021 Tokyo Olympics Gold Medalist Neeraj Chopra PR Sreejesh on Future of Indian Sports टाइम्स नाउ समिट २०२१ या कार्यक्रमात भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि हॉकीपटू पी. आर. श्रीजेश हे दोघे सहभागी झाले

Times Now Summit 2021 Tokyo Olympics Gold Medalist Neeraj Chopra PR Sreejesh on Future of Indian Sports
Times Now Summit 2021: बायोपिकविषयी 'हे' म्हणाले नीरज आणि श्रीजेश 
थोडं पण कामाचं
  • Times Now Summit 2021: बायोपिकविषयी 'हे' म्हणाले नीरज आणि श्रीजेश
  • भारतात खेळांशी संबंधित विचारांमध्ये बदल होत आहे
  • भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळत आहे

Times Now Summit 2021 Tokyo Olympics Gold Medalist Neeraj Chopra PR Sreejesh on Future of Indian Sports । नवी दिल्ली: टाइम्स नाउ समिट २०२१ या कार्यक्रमात भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि हॉकीपटू पी. आर. श्रीजेश हे दोघे सहभागी झाले. नीरजने टोकियो येथे भालाफेकीत सुवर्ण पदक जिंकून भारताला पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये अॅथलेटिक्स श्रेणीतील खेळात पदक मिळवून दिले. तर श्रीजेश हा टोकियो ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारताच्या हॉकी संघाचा सदस्य होता. नीरज आणि श्रीजेश या दोघांशी 'टाइम्स नाउ'चे सीनीयर एडिटर अंकीत त्यागी यांनी बातचीत केली. 

भारतात खेळांशी संबंधित विचारांमध्ये बदल होत आहे. देशात क्रीडा संस्कृती नव्याने विकसित होत आहे. या पार्श्वभूमीवर अंकीत त्यागी यांनी नीरज आणि श्रीजेश या दोघांशी बातचीत केली. 

भारतात क्रीडा संस्कृती वेगाने विकसित होण्यासाठी देशातील तरुण पिढीने खेळ, व्यायाम, फिटनेस जपणे, डाएट सांभाळणे या गोष्टींना त्यांच्या दिनचर्येचा एक भाग करणे आवश्यक आहे; असा मुद्दा बातचीत सुरू असताना पुढे आला.

टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकल्यामुळे एकदम प्रकाश झोतात आलेला भालाफेकपटू नीरज चोप्रा याने त्याचे अनुभव सांगितले. मी २०१६ मध्ये पहिल्यांदा पदक जिंकलो तेव्हापासूनच चर्चेत होतो. आता फक्त चर्चा करणारे वाढले आहेत. पण मी या गोष्टींपासून दूर राहून स्वतःच्या सरावावर लक्ष केंद्रीत केले आहे. अॅथलीटसाठी त्याची मैदानातील कामगिरी जास्त महत्त्वाची असते. या उत्तम कामगिरीसाठी मी तयारी करत आहे. जोपर्यंत माझी कामगिरी उत्तम आहे तोपर्यंतच माझी चर्चा होणार; असे नीरज म्हणाला.

कोरोना संकटामुळे सरावावर परिणाम झाला होता. पण टोकियो ऑलिंपिकच्या निमित्ताने कोविड प्रोटोकॉलचे पालन करुन सराव केला. आता टोकियोतून परतल्यानंतर सर्व खेळाडू पुन्हा एकदा कसून सराव करण्यात गुंतले आहेत. कामगिरी सुधारण्यावर खेळाडूंचा भर आहे.

हॉकीत कांस्य जिंकणाऱ्या भारतीय संघाचा गोलकीपर पी. आर. श्रीजेश म्हणाला, ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्यासाठी खूप वेळ द्यावा लागला. आता मी ३३ वर्षांचा आहे. आयुष्यात अनेक चढउतार बघितले आहेत. पण हॉकीतील आमच्या कामगिरीमुळे केरळच्या हॉकीमध्ये चैतन्य संचारले आहे. आधी केरळ म्हणजे फुटबॉल आणि अॅथलेटिक्स एवढेच मर्यादीत होते. आता यात हॉकीची भर पडल्याचे श्रीजेशने सांगितले. मुलं उत्साहाने हॉकी खेळत आहेत. अनेक मुलं समजून घेऊन खेळात सुधारणा करत आहेत. अनेक खेळाडू ज्यांनी हॉकी खेळणे सोडले होते ते पण फिटनेस जपण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा दानात हॉकी खेळताना दिसत आहेत; असे श्रीजेशने सांगितले. 

भारतात भालाफेक या खेळाची लोकप्रियता एकदम वाढू लागली असल्याचे नीरज म्हणाला. आधी हरयाणा म्हणजे कुस्ती, कबड्डी, बॉक्सिंग असे होते. आता यात भालाफेक या चौथ्या खेळाचा समावेश झाला आहे.

मी खेळायला सुरुवात केली त्यावेळी मला पण भालाफेक हा प्रकार व्यावस्थित माहिती नव्हता. आता अनेकजण भालाफेक या खेळाविषयी जाणून घेऊन तो खेळू लागल्याचे नीरज म्हणाला. नागरिकांच्या वाढत्या क्रीडाप्रेमाचे त्याने जाहीर कौतुक केले.

बातचीत सुरू असताना श्रीजेश म्हणाला की त्याने जीवनात अनेक चढउतार बघितले आहेत. या घडामोडींचा संदर्भ घेऊन एक सिनेमा तयार करणे सहज शक्य आहे. आम्ही २००८ च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये पात्र ठरलो नाही तर लंडनच्या २०१२ च्या ऑलिंपिकमध्ये एकही सामना जिंकू शकलो नाही. पण २०१४ मध्ये भारताने इंचियॉन आशियाई क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करुन पदक जिंकले. या विजयाने भारताला हॉकीमध्ये पुनरागमनाची संधी दिली.

भारताने ऑलिंपिकमध्ये दीर्घ काळ उत्तम कामगिरी केली. यामुळे आता ऑलिंपकसाठी जाताना भारताच्या हॉकी टीमवर कायमच प्रचंड दबाव असतो. पण आता आमच्या चाहत्यांना आणि हितचिंतकांना टीम पदक जिंकू शकेल, असे वाटू लागले आहे. ही आमच्यासाठी चांगली बाब असल्याचे श्रीजेश म्हणाला. 

बायोपिकविषयी बोलताना श्रीजेश म्हणाला की भारताने टोकियो ऑलिंपिकमध्ये छान कामगिरी केली. यामुळे आताच हॉकीचा संदर्भ घेऊन सिनेमा तयार केल्यास लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. पण नीरजने वेगळे मत व्यक्त केले.

भालाफेकीत मी ऑलिंपिकमध्ये सुवर्ण जिंकले तरी अजून भरपूर खेळायचे आहे. आणखी काही पदके जिंकू दे, नंतरच बायोपिक करण्याला अर्थ आहे. आताच घाई केली तर सिनेमासाठी माझे किस्से कमी पडण्याची शक्यता आहे. शिवाय सिनेमा फ्लॉप होण्याचाही धोका आहे; असे नीरज चोप्रा म्हणाला.

पुढच्या ऑलिंपिकमध्ये ९० मीटर हे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवून भालाफेक करणार असल्याचे नीरज म्हणाला. मागील काही वर्षात भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळून स्वतःमधील दोष दूर करण्याची संधी मिळत आहे. या प्रक्रियेतून खेळाडूंची जडणघडण होत आहे. पदक जिंकण्याचा आत्मविश्वास मिळत आहे. मी पण याच पद्धतीने क्षमता वाढवत टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्ण जिंकल्याचे नीरजने सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी