या पाच बँकांच्या ग्राहकांसाठी इशारा, एक मेसेज पाठवून खाते रिकामे करतायत सायबर चोर

टेक इट Easy
Updated Mar 17, 2021 | 14:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठीचा एक मेसेज करून पैसे चोरत आहेत सायबर चोर. असे मेसेज जर तुम्ही उघडून पाहण्याचा प्रयत्न केला तर तुमचे लाखोंचे नुकसान होऊ शकते.

customers of these five banks must be aware of cyber thieves who are emptying accounts with a single message
प्रतिकात्मक फोटो   |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • सायबर गुन्ह्याद्वारे पैसे चोरण्याची नवी युक्ती.
  • आयटीआर भरण्याच्या निमित्ताने माहितीचा गैरवापर
  • तुमची माहिती मिळवण्यासाठी एका मेसेजचा करत आहेत वापर.

नवी दिल्ली: तुम्ही जर आयटीआर भरण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा. कारण, सायबर गुन्हेगार याद्वारे तुम्हाला फसवण्याचे निय़ोजन करत आहेत. सोमवारी प्रकाशित झालेल्या बातमीनुसार सायबर चोर आता आयटीआर भरण्याच्या निमित्ताने तुमची वैयक्तिक माहिती चोरून तुमच्या खात्यातील सर्व पैसे गायब करण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे अशा चुकीच्या मेसेजपासून दूर राहणे ग्राहकांसाठी फायद्याचे असणार आहे. 

सायबर गुन्हे करणारे गुन्हेगार तुमच्या मोबईलवर आयटीआर भरण्यासंबंधतील एक मेसेज पाठवत आहेत. त्या मेसेजसोबत एक लिंकसुद्धा दिलेली असते. त्या लिंकवर क्लिक केल्यास टॅक्स फायलिंगचे पोर्टल उघडते. हे पोर्टल पूर्णपणे बनावट आहे. तेव्हा एखादी व्यक्ती जर या जाळ्यात सापडली तर त्या व्यक्तीचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा मेसेजेसपासून सावध राहण्याची गरज आहे.

या पाच बँकांच्या ग्राहकांवर डोळा

नवी दिल्लीतील सायबरपीस फाउंडेशन आणि सायबर सिक्युरिटी फर्म ऑटोबॉट इन्फोसेकने केलेल्या पाहणीत गंभीर बाब समोर आली आहे. सायबर चोर थेट स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, एचडीएफसी, अॅक्सीस बँक आणि पंजाब नॅशनल बँकांच्या ग्राहकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. या शंकास्पद लिंक अमेरिका आणि फ्रान्समधून तयार करण्यात आल्या असल्याची माहितीही या पाहणी करणाऱ्या संस्थांनी दिली आहे. या लिंकवर क्लिक केल्यास व्यक्तीची वैयक्तिक आणि बँक खात्याबद्दलची माहिती चोरली जात आहे. 

मेसेजमध्ये आहे गडबड 

मेसेजमध्ये शेअर केलेल्या लिंकला कोणतेच डोमेन नेम नाही आणि ती भारत सरकारशीसुद्धा निगडीत नाही. ही लिंक चालवणारे आयपी कोण्या थर्ड पार्टीशी जोडलेले आहे.या लिंकमधून कोणीही तुमची माहिती सहजपणे मिळवू शकतो.

लिंक ओपन केल्यावर उघडते चुकिची वेबसाइट

या मेसेजमध्ये क्लिक केल्यावर ते गुगलवरून अॅप डाऊनलोड न करता थर्ड पार्टी वेबसाईटवर पाठवून देते. त्यावर क्लिक केल्यानंतर ते सरकारी वाटावे अशा एका पेजवर नेते आणि आयटीआर भरण्यासाठी माहिती भरायला सांगते.

लिंक उघडल्यावर विचारली जाते ही माहिती

लिंक उघडल्यानंतर तुम्ही हिरव्या रंगाच्या ‘Proceed to the verification steps’ या बटनावर क्लिक केल्यास तुमचे पूर्ण नाव, पॅन, आधार नंबर, पत्ता, पिनकोड, जन्म तारीख, मोबाइल नंबर, ईमेल, लिंग, वैवाहिक स्थिती आणि अकाउंट नंबर, IFSC कोड, कार्ड नंबर, एक्सपायरी डेट, CVV/CVC आणि कार्ड पिन अशी बँकेबद्दलची माहिती विचारली जाते. आय़एफएससी कोड टाकल्यावर तुमची बँक आपोआप डिटेक्ट केली जाते.

ही माहिती भरल्यावर ती कन्फर्म करण्यासाठी सांगितले जाते. त्यानंतर एका बँकिंग पेजवर जाऊन ऑनलाइन बँकिंगचे यूझरनेम आणि पासवर्ड विचारले जाईल.

मोबाइलमधील विविध सुविधांसाठी परवानगी मागते 

सर्व माहिती भरल्यानंतर ते हिंट क्वेश्चन, उत्तरे, पासवर्ड आणि CIF नंबर टाकण्यास सांगितले जाते. नंतर व्हेरिफिकेशनसाठी वापरले जाणारे एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. त्यात मोबाईलच्या सर्व माहितीशी संबंधित परवानगी घेतली जाते. त्यातून तुमची सर्व वैयक्तिक माहिती त्यांच्याकडे पोचते. या चोरांनी ही सर्व प्रक्रिया ग्राहकांना संशय होऊ नये अशा पद्धतीने तयार केली आहे. त्यामुळे अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवून स्वतःची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी