PUBGवर बंदी येताच अक्षय कुमारने केली FAU-G गेमची घोषणा, लवकरच करणार लॉन्च

FAU-G Action Game: भारतात तरुणांमध्ये क्रेझ असलेल्या पबजी गेमवर आता बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर आता अभिनेता अक्षय कुमार याने FAU-G या अॅक्शन गेमची घोषणा केली आहे. 

FAU-G Fearless And United-Guards action game
FAU-G Fearless And United-Guards action game  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने केली FAU-G गेमची घोषणा
  • उत्पन्नापैकी २०% हिस्सा हा भारत के वीर ट्रस्टला दिला जाणार

FAU-G Game: भारतात तरुणांमध्ये PUBG या गेमची खूपच क्रेझ आणि लोकप्रियता होती. मात्र, सरकारने या पबजीवर बंदी घातली आहे. या गेमवर आता अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने पर्याय शोधला आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने शुक्रवारी आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरुन एका नव्या अॅक्शन गेमची घोषणा केली आहे. अक्षय कुमार याने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन मल्टीप्लेअर गेम FAU-G ची घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला पाठिंबा देत FAU-G हा स्वदेशी गेम लॉन्च करत असल्याचं अक्षय कुमारने म्हटलं आहे. खास बाब अशी की, या गेममधून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी २०% हिस्सा हा 'भारत के वीर ट्रस्ट'ला दिला जाणार आहे. अक्षय कुमारने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे.

Akshay Kumar present FAU-G game

अभिनेता अक्षय कुमार याने ट्वीट करत म्हटलं, "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेला पाठिंबा दर्शविणारा अॅक्शन गेम FAU-G लॉन्च करताना मला आनंद होत आहे. मनोरंजनाच्या व्यतिरिक्त प्लेअर्सला त्याद्वारे सैनिकांच्या बलिदानाबद्दलही माहिती मिळू शकेल. या गेममधून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी २०% हिस्सा हा 'भारत के वीर ट्रस्ट'ला दिला जाणार आहे".

हा गेम नेमका कधी लॉन्च होणार तसेच लॉन्चिंगची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीये. मात्र, गेमची घोषणा झाल्याने हा गेम लवकरच लॉन्च होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात केंद्र सरकारने बुधवारी डिजिटल स्ट्राईक करत ११८ अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यामध्ये प्रसिद्ध मोबाइल गेम PUBG च्या नावाचाही समावेश आहे. PUBG मोबाइल गेम भारतात गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरमधून काढण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी