नवी दिल्ली : जर तुम्ही अॅंड्राईड फोन वापरत असाल आणि तुम्हाला व्हॉट्सअपवर (WhatsApp) नेटफ्लिक्सची (Netflix)फ्री मेंबरशीप देणारा मेसेज आला असेल तर सावध व्हा. गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store)बनावट नेटफ्लिक्स अॅपद्वारे व्हॉट्सअप मेसेजचे ऑटोमॅटीक उत्तर देण्याचा वायरस पसरवण्यात आला आहे. हे बनावट अॅप नेटफ्लिक्सच्या अॅपसारखेच दिसते. त्यामुळे अनेक लोक याला डाऊनलोड करतात आणि सायबर गुन्ह्यांना बळी पडतात. अर्थात सर्वात चांगली बाब ही आहे की आता गुगलने (Google)फ्लिक्सऑनलाईन (FlixOnline)नावाच्या या बनावट अॅपला प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहे.
चेक पॉईंट या सिक्युरिटी कंपनीच्या अभ्यासानुसार फ्लिक्सऑनलाईन या अॅपने ग्राहकांना फसवण्यासाठी नेटफ्लिक्ससारखाच चेहरामोहरा आपल्या अॅपला दिला आहे. शिवाय ग्राहकांना व्हॉट्सअॅप मेसेजच्या माध्यमातून दोन महिन्यांची फ्री मेंबरशीप देण्याची ऑफर दिली जाते. फ्री मेंबरशीपसाठी हे बनावट अॅप एक लिंक पाठवते. त्यामध्ये ग्राहकांच्या क्रेडिट कार्डसहीत त्यांची वैयक्तिक माहिती चोरी केली जाते. यासाठी हे अॅप एका वेबसाईटचा वापर करते. अनेक अॅंड्राईड फोन वापरणारे ग्राहक या फ्रॉडला बळी पडले आहेत. त्यांनी हे नकली अॅप डाऊनलोड केले आहे.
या पद्धतीच्या बनावट मेसेजेला उत्तर देण्याचा अर्थ असतो हॅकरच्या फ्रॉडला बळी पडणे किंवा त्यांच्या फिशिंग आक्रमणाला प्रोत्साहन देणे. यातून मालवेअर पसरवणे किंवा खोटी माहिती पसरवणे किंवा ग्राहकांच्या व्हॉट्सअप अकाउंटमधील माहिती चोरणे इत्यादी कामांना तुम्ही अशा बनावट मेसेजला बळी पडून प्रोत्साहनच देत असता. मागील महिन्यात गुगलने फ्लिक्सऑनलाईन प्ले स्टोअरमधून काढून टाकल्यानंतर फ्लिक्सऑनलाईन अॅप जवळपास ५०० ग्राहकांसाठी जवळपास दोन महिन्यांसाठी उपलब्ध होते.
प्ले स्टोअरच्या माध्यमातून तुमच्या स्मार्टफोनवर फ्लिक्सऑनलाईन हे बनावट अॅप इन्स्टॉल झाल्यानंतर हे अॅप तुमच्याकडे स्क्रीन ओव्हरले, बॅटरी ऑप्टिमायझेशन आणि नोटिफिकेशनसंदर्भातील परवानगी मागते. तुम्ही ही परवानगी दिली की मालवेअर पसरवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. चेक पॉईंटच्या अभ्यासकांनी म्हटले आहे की ओव्हरलेचा वापर मालवेअरद्वारे बनावट लॉग इन बनवण्यासाठी आणि सध्याच्या अॅपच्या विंडोवर खोटी विंडो बनवण्यासाठी ग्राहकांची माहिती चोरण्यासाठी केला जातो. फ्लिक्सऑनलाईन हे अॅप ग्राहकांच्या नोटिफिकेशनवरदेखील लक्ष ठेवून असते. हे अॅप व्हॉट्सअपवर ऑटोमॅटिक उत्तर देत होते.
या सर्व बाबींमधून हे लक्षात येते की ग्राहकांनी डाऊनलोड लिंक किंवा अटॅचमेंट यापासून सावध राहिले पाहिजे. जे मेसेज तुम्हाला दुसऱ्या मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून येतात ते कधीही विश्वासपात्र वाटले तरी त्यांना एकदा क्रॉस केले पाहिजे किंवा तपासून घेतले पाहिजे. त्यापासून सावध राहत खबरदारी घेतली पाहिजे. अन्यथा तुम्ही हॅकर्सच्या जाळ्यात सापडाल आणि स्वत:चे नुकसान करून घ्याल.
सायबर गुन्हे किंवा हॅकिंग हे सध्या प्रचंड वेगाने वाढत चालले आहेत. गुंतागुंतीच्या सायबर दुनियेत प्रत्येक बाबींवर नियंत्रण ठेवणे अवघड आहे. मात्र कोणत्याही मोहाला किंवा आमिषाला बळी न पडता आपण सावध राहिलो आणि कोणत्याही मेसेज किंवा लिंकची खातरजमा करून घेतली तर अशा फ्रॉडपासून आपण स्वत:चे संरक्षण करू शकू.