उर्मिला मातोंडकरचं इंस्टाग्राम हॅक तर गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचं Twitter account हॅक झाल्याचा संशय

राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचंही इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे. 

Maharashtra Mos home satej patil twitter account and urmila matondkar instagram account hacked
उर्मिला मातोंडकरचं इंस्टाग्राम हॅक तर गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचं Twitter account हॅक झाल्याचा संशय 

मुंबई : काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील (MoS Satej Patil) यांचे ट्विटर अकाऊंट (Twitter account) हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. सतेज पाटील यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यावर त्यांचे आतापर्यंतचे सर्व ट्विट डिलिट झाल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी रात्री ट्विटर अकाऊंट हॅक झाले असून बुधवारी सकाळी ही माहिती समोर आली. या प्रकरणी सतेज पाटील यांनी सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. 

बुधवारी सकाळी सतेज पाटील यांनी आपले ट्विटर अकाऊंट पाहिले असता त्यांना आपल्या ट्विटर अकाऊंटवर एकही ट्विट दिसले नाही. तसेच ट्विटर अकाऊंटवर फोटो आणि नावही नव्हते. त्यामुळे अकाऊंट हॅक झाल्याचा संशय त्यांना आला. ट्विटर अकाऊंटवरुन कोणतेही आक्षेपार्ह ट्विट किंवा माहिती पोस्ट करण्यात आल्याचं दिसत नाहीये त्यामुळे हे अकाऊंट हॅक झाले आहे का याबाबत तपास सुरू आहे. 

तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री आणि काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकरचं (Urmila Matondkar) इंस्टाग्राम अकाऊंट हॅक (Instagram account hacked) झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: उर्मिला मातोंडकरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. 

उर्मिला मातोंडकरने ट्विट करत म्हटलं, "माझे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाले आहे. सर्वप्रथम ते तुम्हाला डीएम करतात त्यानंतर काही स्टेप्स फॉलो करण्यास सांगतात आणि मग तुमचे अकाऊंट हॅक होते... खरोखरं? "

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने अनेक सिनेमांत भूमिका केली आहे. त्यापैकी काही भूमिका प्रचंड गाजल्या आहेत. उर्मिलाने २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेस पक्षाने उर्मिलाला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, या निवडणुकीत उर्मिलाचा पराभव झाला. त्यानंतर काही दिवसांनी उर्मिलाने काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वीच उर्मिलाने आपल्या हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी