Online betting games bans: 'या' राज्यात ऑनलाईन बेटिंग गेम्सवर बंदी

Online betting games bans: सट्टेबाजीशी संबंधित ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्याचा निर्णय तमिळनाडू सरकारने घेतला आहे. इतकेच नाही तर आता अशा प्रकारे गेम खेळताना कुणी आढळल्यास दंड आणि कारावासाची शिक्षा होणार आहे.

Online betting games
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

चेन्नई : तमिळनाडू (Tamil Nadu) राज्य सरकारने सट्टेबाजीशी संबंधित ऑनलाईन बेटिंग गेम्सवर बंदी (Online betting games bans) घातली आहे. या सट्टेबाजीच्या खेळात अनेकांनी आपले पैसे गमावले आहेत तर काहींनी आत्महत्या सुद्धा केल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर तमिळनाडू सरकारने या गेमिंगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन बेटिंग गेम्सवर बंदी घातल्याने त्याचा समाजावर सकारात्मक आणि चांगला परिणाम दिसून येईल अशा विश्वास तमिळनाडू सरकारने व्यक्त केला आहे.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी सांगितले की, राज्यात सट्टेबाजीशी संबंधित गेममध्ये पैसे गमावल्याच्या तसेच आत्महत्येच्या घटना घडल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या. त्यानंतर राज्य सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी अध्यादेश सुद्धा काढला आहे. 

तमिळनाडू सरकारने सांगितले की, स्ट्टेबाजीशी संबंधित ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे अशा प्रकारचे गेम्स खेळताना कुणी दोषी आढळला तर त्या व्यक्तीला ५,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल तसेच सहा महिन्यांचा तुरुंगवासही होऊ शकतो. यासोबतच सट्टेबाजी चालवणाऱ्या व्यक्तीला दोन वर्षांची शिक्षा आणि १०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल.

तीन कायद्यांमध्ये सुधारणा 

तमिळनाडू सरकारने काढलेल्या अध्यादेशामुळे तमिळनाडूमध्ये गेमिंग अॅक्ट, १९३० (तमिळनाडू अॅक्ट III), चेन्नई सिटी पोलीस अॅक्ट, १८८८ (तमिळनाडू अॅक्ट III) आणि तमिळनाडू जिल्हा पोलीस कायदा, १८५९ (तमिळनाडू अॅक्ट २४)मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. 

काय आहे अद्यादेश 

  1. कम्प्यूटरचा वापर करुन सायबर स्पेसमध्ये बेटिंग लावणाऱ्या व्यक्तींवर निर्बंध 
  2. ऑनलाईन बेटिंग गेमिंग खेळताना आढळल्यास ५ हजारांचा दंड, सहा महिने कारावासाची शिक्षा 
  3. गेमिंग हाऊस सुरू करणे तसेच चालवणाऱ्या व्यक्तीला २ वर्षांची शिक्षा आणि १० हजारंचा दंड 
  4. सट्टेबाजी संबंधित ऑनलाईन गेमिंग चालवणाऱ्या कंपन्यांच्या ऑपरेटरला होणार शिक्षा 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी