Tata Nano: टाटा नॅनोला उतरती कळा; सहा महिन्यांत फक्त एकाच कारची विक्री

टेक इट Easy
Updated Jul 03, 2019 | 19:37 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Tata Nano: गेल्या काही वर्षांत नॅनोला उतरती कळा आली आहे. टाटा कंपनीने जानेवारीपासून नॅनोचे उत्पादनच बंद केले आहे. सहा महिन्यांत केवळ एकच नॅनो विकली असून फेब्रुवारीनंतर एकही विकली नाही, अशी माहिती कंपनीने दिली.

Tata Nano
टाटाच्या नॅनोला उतरती कळा   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • टाटा कंपनीने नॅनोचे उत्पादन अखेर थांबवले
  • मागणीनुसारच नॅनोचे उत्पादन करण्याचा निर्णय
  • कारचे उत्पादन थांबवण्याबाबत अद्याप निर्णय नाही

नवी दिल्ली : ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांनी मोठ्या प्रतीक्षेनंतर एक लाखांत कार देण्याचे वचन पूर्ण केले होते. जगातील सर्वांत स्वस्त कार म्हणून नॅनोची ओळख झाली होती. कार बाजारात आली, रस्त्यांवर दिसू लागली. पण, कारला म्हणावी तेवढी लोकप्रियता मिळाली नाही. गेल्या काही वर्षांत नॅनोला उतरती कळा आली आहे. टाटा कंपनीने जानेवारीपासून नॅनोचे उत्पादनच बंद केले आहे. गेल्या सहा महिन्यांत केवळ एकच नॅनो कार विकली गेली आहे. त्यातही फेब्रुवारी ते जून अखेरपर्यंत एकाही नॅनो कारची विक्री झाली नाही. टाटा कंपनीने शेअर बाजारात दिलेल्या माहितीमध्ये हे स्पष्ट केले आहे. पण, कंपनीने या कारचे उत्पादन थांबवण्याचा कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नसल्याचे सांगितले आहे. बाजारपेठेतील मागणीनुसारच या कारची निर्मिती केली जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

मागणीनुसार विक्री

टाटा मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने डिसेंबर २०१८मध्ये शेवटचे नॅनो उत्पादन केले होते. त्यावेळी साणंद येथील कंपनीच्या कारखान्यातून ८२ नॅनो कारचे उत्पादन झाले होते. विक्रीचा विचार केला तर जानेवारी ते जून २०१९ या काळात कंपनीने केवळ एकच नॅनो कार विकली आहे. त्यातही ती कार जानेवारी महिन्यात विकली आहे. फेब्रुवारीनंतर आतापर्यंत एकाही नॅनो कारची विक्री झालेली नाही. त्यावर टाटा मोटर्सच्या प्रवक्तांना नॅनोची विक्री पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे का? असे विचारण्यात आले. त्यावर त्यांनी ‘याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले.’ कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आम्ही मागणीनुसार कारची विक्री करत आहोत. निर्यातीच्याबाबतीतही नॅनोचा परफॉर्मन्स खराब आहे. जानेवारी ते जून या कालावधीत एकाही नॅनो कारची विक्री झालेली नाही. टाटा मोटर्सने यापूर्वीच २०२०मध्ये नॅनो उत्पादन बंद करण्याचे संकेत दिले होते. गेल्या वर्षीपासूनच या कारच्या विक्रीमध्ये मोठी घसरण पहायला मिळाली. त्यामुळे कंपनीने कारच्या उत्पादनावर मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला.

‘एक लाखात कार’

टाटा कंपनीचा विशेषतः रतन टाटा यांचा नॅनो हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होता. त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. रतन टाटा यांनी भारतीयांना एक लाखात कार देण्याची ग्वाही दिली होती. २००८मध्ये ही कार लाँच करण्यात आली होती. सुरुवातीला केवळ भारतातच नव्हे तर, विदेशातही या कारची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली होती. पण, प्रिमियम कारच्या चलतीमध्ये हळू हळू ही कार मागे पडत गेली. लाँचिंगच्यावेळी त्याची किंमत एक लाख रुपयेच होती. सध्या या कारची किंमत २ लाख ३६ हजार ते ३ लाख ६५ पर्यंत जाते.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Tata Nano: टाटा नॅनोला उतरती कळा; सहा महिन्यांत फक्त एकाच कारची विक्री Description: Tata Nano: गेल्या काही वर्षांत नॅनोला उतरती कळा आली आहे. टाटा कंपनीने जानेवारीपासून नॅनोचे उत्पादनच बंद केले आहे. सहा महिन्यांत केवळ एकच नॅनो विकली असून फेब्रुवारीनंतर एकही विकली नाही, अशी माहिती कंपनीने दिली.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola