World Environment Day 2022 : एसी असो वा मोबाईलचं कव्हर… पर्यावरण रक्षणासाठी या 9 गोष्टी करायलाच हव्यात !

आपली पृथ्वी अधिकाधिक हिरवीगार ठेवण्यासाठी प्रत्येकजण योगदान देऊ शकतो. त्यासाठी आपल्या सवयींमध्ये छोटे बदल करण्यासाठी आणि काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे.

World Environment Day 2022
पर्यावरणासाठी या 9 गोष्टी करा  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकजण करू शकतो मदत
  • उपकरणे वापरताना बाळगा निसर्गाचे भान
  • मोबाईलच्या चार्जरपासून एसीपर्यंत सगळ्यासाठी निवडा 'इको फ्रेंडली' पर्याय

World Environment Day 2022 | दरवर्षी 5 जून (5 June) हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाचं रक्षण करणं ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे आणि अनेकजण ती मनापासून पार पाडण्याचा प्रयत्न करतात. मात्र काहींना आपल्या विशिष्ट निर्णयाचा पर्यावरणावर काय परिणाम होतो, याची जाणीवच नसते. आपल्या प्रत्येक कृतीपूर्वी त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होईल, याचा विचार करण्याची सवय लागली तरीही पर्यावरण रक्षणाचं मोठं काम उभं राहिल, असं सांगितलं जातं. प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती पर्यावरण रक्षणसाठी काय करू शकते, असा प्रश्नही अनेकदा विचारला जातो. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समजून घेऊया अशा काही महत्त्वाच्या बाबी, ज्यांचं पालन प्रत्येकजण करू शकतो आणि पर्यावरण अधिक हिरवंगार ठेवण्यात खारीचा वाटा उचलू शकतो. 

1. जुनी गॅझेट्स पुन्हा वापरा

अनेकदा आपल्याकडे असणारी गॅझेट्स ही जुनी झाली किंवा ती वापरण्याचा कंटाळा आला या कारणासाठी फेकून दिली जातात. मात्र जी उपकरणं व्यवस्थित सुरू आहेत, ती शक्यतो फेकून देऊ नका. त्यांचा वापर करा. उदाहरणार्थ, काही व्यक्तींना त्यांचा मोबाईल दरवर्षी बदलण्याची सवय असते. पण जर तो मोबाईल व्यवस्थित चालत असेल, तर नवा मोबाईल घेणं टाळा. जरी तुमच्या मोबाईलमध्ये एखादा भाग खराब झाला, तरी त्याचा सुरू असणारा दुसरा भाग वापरत राहा. उदाहरणार्थ, जर मोबाईलचा कॅमेरा खराब झाला असेल, तर तेवढ्यासाठी पूर्ण मोबाईल फेकू नका. त्यातील म्युझीक प्लेअर, कॉलिंग सिस्टिम यासारख्या इतर सुविधांचा वापर करा. 

2. खराब गॅझेट्सची नीट विल्हेवाट लावा

जर एखादं उपकरण पूर्णपणे खराब झालं असेल आणि टाकूनच द्यावं लागणार असेल, तर त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावा. त्या उपकरणामुळे ई-कचऱ्यात भर पडणार नाही, याची काळजी घ्या. 

3. इको फ्रेंडली पॅकेजिंग असणारी उत्पादनं विकत घ्या

नव्या वस्तू घेताना इको-फ्रेंडली पद्धतीनं पॅक केलेल्या गोष्टींची निवड करा. ऑनलाईन खरेदी करत असताना इको-फ्रेंडली पॅकेजिंग असणाऱ्या वस्तू निवडा आणि त्याच ऑर्डर करा. पॅकेजिंग टाकून दिल्यानंतर ई-कचऱ्यात भर पडणार नाही, याची काळजी घ्या. 

4. कागद-पेन विसरा, डिजिटल व्हा

कागदाचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला कागदांवर खूप लिहिण्याची सवय असेल, तर त्याऐवजी डिजिटल यंत्रणेचा वापर लिहिण्यासाठी करा. छोट्या मोठ्या नोंदी ठेवण्यासाठी, मुद्दे लक्षात ठेवण्यासाठी कागदाऐवजी मोबाईल किंवा लॅपटॉपमधील नोटपॅडचा वापर करा. 

5. एसी किंवा फ्रीजसाठी इको-फ्रेंडली कूलंट निवडा 

एसीसाठी R32 आणि फ्रीजसाठी r600a हे कुलंट निवडण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे धोकादायक ग्रीनहाऊस गॅस तयार होणार नाहीत आणि तुम्ही पर्यावरण रक्षणात खारीचा वाटा उचलू शकाल. जर तुमच्या बजेटमध्ये ते बसत नसेल तर किमान ओझोन-फ्रेंडली उपकरणं घेण्याचा प्रयत्न करा. 

6. नव्या मोबाईलसाठी नवा चार्जर घेऊ नका

जेव्हा जेव्हा तुम्ही नवा मोबाईल विकत घेता, त्यावेळी नवा चार्जर विकत घेण्याची गरज नाही. अनेकदा नव्या मोबाईलसाठी जुना चार्जर कम्पिटिबल असतो. अलिकडे अनेक मोबाईल कंपन्यांनी मोबाईलसोबत चार्जर देणं बंदही केलं आहे. 

7. प्लॅस्टिकचे फोन  कव्हर वापरू नका

मोबाईलसाठी कव्हर घेताना शक्यतो प्लॅस्टिकचे कव्हर घेेणे टाळा. त्याऐवजी पॉलीकार्बोनेट किंवा लेदर कव्हरची निवड करा.

8. वीजेची बचत करणारी उपकरणे निवडा

उपकरणांची निवड करताना ती कमीत कमी विजेचा वापर करून जास्तीत जास्त चालतील, याचा हिशेब ठेवा. वीज वाचवणे हा सुद्धा पर्यावरण रक्षणाचाच एक मार्ग आहे. 

9. ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांचा वापर करा

वीजेऐवजी ऊर्जेच्या इतर स्रोतांचा वापर करा. अधिकाधिक सौरऊर्जेचा वापर कसा करता येईल, याचा विचार करा.सोलर लाईट, सोलर गीझरचा वापर वाढवा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी