मारुतीची नवीन कार मिळणार मासिक शुल्कावर, पाहा काय आहे प्लॅन 

Maruti Subscription : देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुतीने मासिक फीनुसार नवीन कारसाठी सबस्क्रिप्शन प्रोग्राम सुरू केला आहे.

maruti suzuki
मारुतीची नवीन कार मिळणार मासिक शुल्कावर, पाहा काय आहे प्लॅन   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • मारुती सुझुकी इंडियाने सब्सक्रिप्शन कार्यक्रम सुरू केला
  • हा कार्यक्रम नुकताच दिल्ली, एनसीआर आणि बंगळुरुमध्ये सुरू झाला आहे
  • हा कार्यक्रम देशातील ६० शहरांमध्ये विस्तारित करण्याचा कंपनीचा प्लॅन

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी (maruti suzuki) इंडियाने आपलं वाहन सबस्क्रिप्शन (subscription) कार्यक्रम 'मारुती सुझुकी सबस्क्राईब' सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने गुरुवारी सांगितलं की, कंपनीने आता हा कार्यक्रम दिल्ली, एनसीआर (नोएडा, गाझियाबाद, फरीदाबाद, गुरुग्राम) आणि बंगळुरु येथे सुरू केलं आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत देशभरातील ६० शहरांमध्ये हा कार्यक्रम सुरु करण्याचा कंपनीचा प्लॅन आहे.

मारुती सुझुकीने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी या कार्यक्रमासाठी जपानची उपकंपनी ओरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस इंडियाशी करार केला आहे. या सेवे अंतर्गत ग्राहक मारुती सुझुकी अरिना ते नवीन स्विफ्ट डिजायर, विटारा ब्रेझा, अर्टिगा तर नेक्सामधून नवीन बलेनो, सियाज आणि एक्सएल 6 ची कार घेण्याचा विकल्प निवडू शकतात.

कंपनीने म्हटले आहे की, या कार्यक्रमांतर्गत ग्राहक (customers) वाहनाची मालकी न घेता नवीन कार (New Car) वापरू शकतात. यासाठी त्यांना मासिक फी (monthly fee) भरावी लागेल. या मासिक शुल्कात  संपूर्ण देखभाल, विमा आणि रस्त्यावर गाडी खराब झाल्यावर सहाय्य यांचा समावेश आहे.

या वाहनांसाठी ग्राहक १२ महिन्यांपासून ४८ महिन्यांचं सब्सक्रिप्शन घेऊ शकतात. दिल्लीत स्विफ्ट एलएक्सआयच्या  ४८ महिन्यांच्या सब्सक्रिप्शनचं मासिक शुल्क १४,४६३  रुपये (कर सहित) पासून सुरू होते. सबस्क्रिप्शनचा अवधी संपल्यानंतर ग्राहक नवीन कार देखील घेऊ शकतात. ते आपलं सब्सक्रिप्शन वाढवू शकतात किंवा बाजारभावाने गाडी खरेदी करू शकतात.

मारुती सुझुकीचे कार्यकारी संचालक (विपणन व विक्री) शशांक श्रीवास्तव म्हणाले की, हा उपक्रम वैयक्तिक ग्राहकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आला आहे. यासाठी कोणतीही आगाऊ रक्कम द्यावी लागणार नाही. मासिक शुल्कामध्ये नोंदणी, विमा आणि नूतनीकरण आणि सामान्य देखभाल खर्च यांचा समावेश असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी