फक्त २४ तासात झाली १ लाख ओला इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग, देशातील नागरिकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे

Ola Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग सुरू झाल्यानंतर फक्त २४ तासांमध्ये तब्बल १ लाख इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग झाल्याची माहिती ओला इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अगरवाल यांनी दिली आहे.

Ola Electric Scooter
ओला इलेक्ट्रिक स्कूटर 

थोडं पण कामाचं

  • बुकिंग सुरू केल्यानंतर ओला इलेक्ट्रिक स्कूटरला विक्रमी प्रतिसाद
  • ओलाचे सीईओ भाविष अगरवाल यांनी दिले ग्राहकांना धन्यवाद
  • देशातील ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे

नवी दिल्ली : एकामागोमाग एक ऑटोमोबाईल कंपनी इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicles) बाजारात आणत असताना ओला इलेक्ट्रिकने देखील आपली इलेक्ट्रिक स्कूटर (Ola Electric Scooter) बाजारात आणली आहे. इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग सुरू झाल्यानंतर फक्त २४ तासांमध्ये तब्बल १ लाख ओला इलेक्ट्रिक स्कूटरची (Ola Electric Scooter receives record Booking)बुकिंग झाल्याची माहिती ओला इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अगरवाल (Ola Electric CEO Bhavish Aggarwal) यांनी दिली आहे. ओलाने आपली प्री-लॉंच बुकिंग सुरू केल्यानंतर फक्त २४ तासातच विक्रमी बुकिंग झाल्याने ओला ई-स्कूटर ही जगातील सर्वाधिक प्री-बुक्ड स्कूटर बनली आहे. ओला इलेक्ट्रिकने १५ जुलैला फक्त ४९९ रुपयांच्या टोकन रकमेत आपल्या वेबसाईटवर बुकिंग खुली केली होती.  (In just 24 hours of opening of pre-launch bookings,1 lakh Ola Electric Scooter booked across India) 

भाविश अगरवाल यांनी दिले धन्यवाद

'भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची क्रांती एकदम धडाक्यात होते आहे. आमच्या इलेक्ट्रिक स्कूटरशी जोडून घेतल्याबद्दल आणि स्कूटरची बुकिंग केल्याबद्दल १ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांना खूप धन्यवाद, अशा भावना भाविश अगरवाल यांनी ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत. आमच्या पहिल्याच इलेक्ट्रिक वाहनाला सर्व भारतातील ग्राहकांनी दिलेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे हरखून गेलो आहे. एवढ्या अभूतपूर्व मागणीचा अर्थ आता ग्राहक त्यांचे प्राधान्य इलेक्ट्रिक वाहनांना देत आहेत हे स्पष्ट आहे. जगभरातील वाहतुक ही शाश्वत स्वरुपाची असावी या आमच्या ध्येयाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.ज्यांनी ओला इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग केली आहे अशा सर्व ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांच्या क्रांतीमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी धन्यवाद देतो. ही फक्त एक सुरूवात आहे,' अशा शब्दात भाविश अगरवाल यांनी ओला इलेक्ट्रिकला ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

वैशिष्टपूर्ण नवी ओला इलेक्ट्रिक स्कूटर 

नवीन ओला इलेक्ट्रिक स्कूटर ही या महिन्यात देशभर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ओला इलेक्ट्रिकने दावा केला आहे की या स्कूटरला सर्वोत्तम वाहनांच्या यादीत स्थान मिळेल. नवीन ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक वैशिष्टपूर्ण सुविधा असून चटकन वेग पटकडण्याची क्षमता या स्कूटरमध्ये आहे. शिवाय याच्या  बूटमध्ये दोन हेल्मेट ठेवण्याएवढी जागा आहे. शिवाय ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरची रचनाही आकर्षक आहे आणि चालवण्यासाठी अनूकूल आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणताना सीईओ भाविश अगरवाल यांनी ते स्कूटर चालवत असल्याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर केला होता.

इलेक्ट्रिक वाहनांचा जमाना

सध्या भारतात मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक वाहने बाजारात येत आहेत. दिसायला आकर्षक, मेंटेनन्स फारसा नाही, प्रदूषणमुक्त वाहन आणि सर्वात महत्त्वाचे इंधनावरील खर्चाची बचत या वैशिष्ट्यांमुळे इलेक्ट्रिक वाहने अधिकाधिक नागरिकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यातच अलीकडच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. या मुद्द्यामुळेदेखील भविष्यात नागरिकांचा कल अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहन विकत घेण्याकडे असेल अशीच चिन्हे आहेत. ओला इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादातून हीच बाब अधोरेखित होताना दिसते आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी