आयआयटी मद्रासने तयार केली झिंक एअर बॅटरी, इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याचा धोका कमी होणार

zinc air battery developed by IIT Madras will reduce risk of electric scooters catching fire : चेन्नईच्या आयआयटी मद्रासमधील विद्यार्थ्यांच्या पथकाने इलेक्ट्रिक स्कूटरसाठी भारतीय वातावरणाला अनुकूल अशी झिंक एअर बॅटरी तयार केली आहे. या बॅटरीमुळे इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याचा धोका कमी होईल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

zinc air battery developed by IIT Madras will reduce risk of electric scooters catching fire
आयआयटी मद्रासने तयार केली झिंक एअर बॅटरी, इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याचा धोका कमी होणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आयआयटी मद्रासने तयार केली झिंक एअर बॅटरी
  • इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याचा धोका कमी होणार
  • आयआयटी मद्रासने १.३ ते २.६ किलो वॅट अवर क्षमतेची झिंक एअर बॅटरी विकसित केली

zinc air battery developed by IIT Madras will reduce risk of electric scooters catching fire : चेन्नई : इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वापरली जाणारी लिथियम आयर्न बॅटरी ही पाश्चात्य देशांतील थंड वातावरणात सुरक्षित आहे. पण भारतीय वातावरणात उन्हात तापल्यामुळे काही वेळा या बॅटरीला आग लागत होती. हा धोका कमी करणारी उपाय सापडला आहे. चेन्नईच्या आयआयटी मद्रासमधील विद्यार्थ्यांच्या पथकाने इलेक्ट्रिक स्कूटरसाठी भारतीय वातावरणाला अनुकूल अशी झिंक एअर बॅटरी तयार केली आहे. या बॅटरीमुळे इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याचा धोका कमी होईल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

आयआयटी मद्रासच्या केमिकल इंजिनिअरिंग विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अरविंद कुमार चंद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या पथकाने प्रायोगिक तत्वावर झिंक एअर बॅटरी तयार केली आहे. लिथियम आयर्न बॅटरीच्या तुलनेत झिंक एअर बॅटरी पर्यावरणासाठी जास्त अनुकूल आहे. या बॅटरीत एक झिंक इलेक्ट्रोड आहे. या इलेक्ट्रोडचा वातावरणातील ऑक्सिजनशी नियंत्रित पद्धतीने संपर्क होतो. यातून ऊर्जेची निर्मिती होते आणि वाहन चालविता येते. या प्रकारात अंतिम टप्प्यात पाणी तयार होते. या पाण्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्याची व्यवस्था इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये करणे सहज शक्य आहे. यामुळे झिंक एअर बॅटरीचा वापर केल्यास इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याची शक्यता नगण्य होते, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. झिंक एअर बॅटरी डिस्चार्ज झाल्यावर रीचार्ज करणे अथवा बॅटरीतील डिस्चार्ज झालेला झिंक इलेक्ट्रोड काढून त्याजागी दुसरा चार्ज असलेला झिंक इलेक्ट्रोड बसविणे सोपे आहे; असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. लिथियम आयर्न बॅटरी चार्ज करणे किंवा पूर्ण डिस्चार्ज बॅटरी काढून दुसरी चार्ज बॅटरी वाहनात बसविणे यापेक्षा झिंक एअर बॅटरीची चार्जिंग आणि रिप्लेसमेंटची प्रक्रिया सोपी असल्याचे विद्यार्थी म्हणाले.

झिंक एअर बॅटरी ही भारतात तयार केली आहे. यामुळे भविष्यात व्यावसायिक वापर होईल त्यावेळी बॅटरीसाठी देश आत्मनिर्भर झाला असेल. भारतात साठा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे देशाला झिंकसाठी कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही. सध्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीसाठी आयात केली जात आहे. ही आयात प्रामुख्याने चीनमधून होत आहे. झिंक एअर बॅटरीमुळे आयात कमी होईल आणि दर्जेदार इलेक्ट्रिक स्कूटर भारतात उपलब्ध होतील. उत्पादन वाढवून भारताला झिंक एअर बॅटरी आणि या बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरची निर्यात करणेही शक्य होईल.  

आयआयटी मद्रासने १.३ ते २.६ किलो वॅट अवर क्षमतेची झिंक एअर बॅटरी विकसित केली आहे. सध्या भारतात कार्यरत इलेक्ट्रिक स्कूटर प्रामुख्याने २ किलो वॅट अवर क्षमतेची बॅटरी वापरत आहेत. यामुळे आयआयटी मद्रासची झिंक एअर बॅटरी भारतातील इलेक्ट्रिक स्कूटरसाठी उपयुक्त आहे.

झिंक एअर बॅटरी इलेक्ट्रिक स्कूटरला ऊर्जा पुरविण्यासाठी सक्षम आहे. पण इलेक्ट्रिक कार चालविण्यासाठी अल्पावधीत जेवढी ऊर्जा लागते तेवढी ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता झिंकमध्ये नाही. यामुळे इलेक्ट्रिक कारसाठी आजही लिथियम आयर्न बॅटरी हाच उपलब्ध असलेला सर्वोत्तम पर्याय आहे. बॅटरीच्या क्षेत्रात अनेकजण संशोधन करत आहेत. यामुळे भविष्यात कारच्या लिथियम आयर्न बॅटरीसाठी पर्याय सापडेल असा विश्वास आयआयटी मद्रासच्या केमिकल इंजिनिअरिंग विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अरविंद कुमार चंद्रन यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी