मुंबई : गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता टेस्ला (Tesla) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क (Elon Musk) यांनी बंगळुरू (Bengaluru) येथे आपल्या कंपनीची नोंदणी करत भारतात (Indian market) एन्ट्री केली आहे. कंपनीच्या रजिस्ट्रार वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, टेस्ला इंडिया मोर्टर्स अँण्ड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचा समावेश असून नोंदणीकृत पत्ता हा लावेल रोड, बंगळुरू येथील आहे.
आरओसी फायलिंगमध्ये कंपनीने म्हटले, "टेस्लाने ८ जानेवारी रोजी बंगळुरू रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (आरओसी)सोबत आपली अधिकृत भारतीय सहाय्यक कंपनीची नोंदणी केली, ज्यामध्ये १५ लाखांचे अधिकृत भांडवल आणि १ लाख रुपयांचे पेड-अप कॅपटल होते."
सिटी सेंटरमध्ये विभव तनेजा यांच्यासोबत टेस्ला इंडिया मोटर्स अँण्ड एनर्जी लिमिटेड सुरू केली आहे. वेंकटरंगम श्रीराम आणि डेव्हिड जॉन फाईंस्टाइन याचे निर्देशक असतील. विभव तनेजा हे टेस्ला कंपनीत चीफ अकाऊंटिंग ऑफिसर आहेत तर फाईंस्टाइन टेस्लामध्ये वरिष्ठ संचालक (ग्लोबल ट्रेड न्यू मार्केट) आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनीही ट्विट करत म्हटलं, टेस्ला कंपनी लवकरच बंगळुरू येथे आपले संशोधन आणि विकास (आर अँड डी) केंद्राची स्थापना करत आहेत. टेस्ला कंपनीला राज्यात आमंत्रित करण्यासाठी कर्नाटक सरकारने जोरदार रणनिती आखली होती.
टेस्ला कंपनी भारतातील महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश सारख्या इतर राज्य सरकारांच्याही संपर्क साधत असल्याची माहिती आहे.
टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी गेल्या ऑक्टोबर महिन्यात सांगितले होते की, २०२१ मध्ये त्यांची कंपनी भारतीय बाजारात प्रवेश करु शकते. एलॉन मस्क यांनी एका ट्विटला उत्तर देत म्हटले होते की, पुढील वर्षी त्यांची कंपनी निश्चितच भारतीय बाजारात प्रवेश करेल.