सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मारुतीची स्पेशल ऑफर, कार खरेदीवर मिळणार मोठी सूट 

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खास ऑफर आणली आहे. त्यामुळे त्यांना कार खरेदी करताना बरीच सूट मिळणार आहे. 

Maruti Suzuki
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी स्पेशल ऑफर, कार खरेदीवर मिळणार सूट  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • सरकारी कर्मचार्‍यांनी एलटीसीच्या बदल्यात कॅश व्हाउचर जाहीर केले आहेत, त्यामुळे कार खरेदीची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे
  • मारुती सुझुकीच्या विविध मॉडेल्सच्या खरेदीवर 11,000 रुपयांपर्यंतचा फायदा होईल
  • वेगवेगळ्या मॉडेल्सना वेगळी सूट दिली जाईल.

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (एमएसआय) सरकारी कर्मचार्‍यांसाठी विशेष ऑफर आणली आहे. त्याअंतर्गत सणांच्या हंगामात सरकारी कर्मचार्‍यांना विविध मॉडेल्सच्या खरेदीवर 11,0000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतीच एलटीसीच्या बदल्यात सरकारी कर्मचार्‍यांसाठी रोख व्हाउचर जाहीर केले आहेत. कंपनीच्या मते, सरकारच्या या घोषणेनंतर सुझुकीच्या या खास ऑफरमुळे मागणीला आणखी वाढण्यास नक्कीच मदत होईल.

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पोलिस आणि निमलष्करी दलांसह केंद्र आणि राज्य सरकारच्या विभागांचे कर्मचारी हे नवीन मारुती सुझुकी वाहन खरेदी करण्याच्या या ऑफरचा लाभ घेण्यास सक्षम असल्याचे कंपनीने रविवारी सांगितले. या ऑफरअंतर्गत वेगवेगळ्या मॉडेल्सवर वेगवेगळी सूट दिली जाईल. मारुती सुझुकीने याबाबत माहिती देताना म्हटलं आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेत अरेना आणि नेक्साद्वारे विकल्या जाणाऱ्या सर्व वाहनांवर ऑफर लागू असणार आहे. ऑल्टो, सेलेरिओ, एस-प्रेसो, वॅगन-आर, इको, स्विफ्ट डिजायर, इग्निस, बलेनो, विटारा ब्रेझा, अर्टिगा, एक्सएल 6, कियाझ आणि एस-क्रॉसवर ही ऑफर लागू होईल.

मारुती सुझुकीचे कार्यकारी संचालक (विपणन व विक्री) शशांक श्रीवास्तव म्हणाले, कोविड-१९ साथीच्या काळात ग्राहक खर्च वाढवण्यासाठी सरकारने अनेक ठोस उपाययोजना केल्या आहेत. आमचे देखील कर्तव्य  आहे की आम्ही अर्थव्यवस्थेला पाठिंबा दिला पाहिजे आणि सकारात्मकरित्या पुढे गेलं पाहिजे.

श्रीवास्तव म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या एक कोटीपेक्षा जास्त आहे. मारुती सुझुकीसाठी ग्राहकांचा हा सर्वात मोठा वर्ग आहे. हे लक्षात घेता आम्ही सरकारी कर्मचार्‍यांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे. याद्वारे, ते त्यांच्या आवडीची कार खरेदी करण्यास आणि एलटीसी कॅश व्हाउचर योजनेच्या फायद्यांव्यतिरिक्त सूट मिळविण्यास सक्षम असतील.

नुकत्याच जाहीर झालेल्या एलटीसी कॅश व्हाउचर योजनेचा फायदा सुमारे ४५ लाख केंद्रीय व संरक्षण कर्मचाऱ्यांना होईल, असे कंपनीने म्हटले आहे. यामुळे ३१ मार्च २०२१ पर्यंत अतिरिक्त ग्राहकांची 28,000 कोटी रुपयांची मागणी होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी