ऑलिम्पस कंपनी कॅमेरा निर्मितीचा व्यवसाय ८४ वर्षांनंतर बंद करणार

Olympus Quits Camera ऑलिम्पस कंपनीने ८४ वर्षांनंतर कॅमेरा निर्मिती विभाग कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतला.

Olympus quits camera business after 84 years
ऑलिम्पस कंपनी कॅमेरा निर्मितीचा व्यवसाय ८४ वर्षांनंतर बंद करणार 

थोडं पण कामाचं

  • ऑलिम्पस कंपनी कॅमेरा निर्मितीचा व्यवसाय ८४ वर्षांनंतर बंद करणार
  • मागील ३ वर्षांपासून तोट्यात होती कंपनी
  • वैद्यकीय संशोधनाशी संबंधित सुक्ष्म कॅमेरा उपकरणांचा निर्मिती करणार

नवी दिल्ली: कॅमेरा उद्योगात उत्तुंग शिखरे पादाक्रांत करणाऱ्या आणि डिजिटल कॅमेरा निर्मितीच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या ऑलिम्पस (Olympus ) कंपनीने ८४ वर्षांनंतर कॅमेरा निर्मिती विभाग कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतला. स्मार्टफोनमुळे आधुनिक मोठ्या क्षमतेचा डिजिटल कॅमेरा सहज उपलब्ध आहे. याच कारणामुळे मुद्दाम कॅमेरा खरेदी करुन फोटो काढणे कमी झाले आहे. शिवाय मागील ३ वर्षांपासून सातत्याने तोटा होत असल्यामुळे ऑलिम्पस कंपनीने कॅमेरा निर्मिती विभाग बंद करत असल्याचे जाहीर केले. 

जपानच्या ऑलिम्पस कंपनीने पहिला व्यावसायिक कॅमेरा १९३६ मध्ये बाजारात आणला होता. जेव्हा हा कॅमेरा बाजारात आला तेव्हा सामान्य जपानी माणसाच्या एका महिन्याच्या पगाराएवढे पैसे मोजून कॅमेरा खरेदी करावा लागत होता. सुरुवातीच्या काळात जपानमधील संपन्न फोटोग्राफच्या घरांमध्ये असलेला कॅमेरा हळू हळू सामान्य कुटुंबांमध्येही प्रवेश करण्यात यशस्वी झाला. कॅमेरा निर्मितीचे प्रमाण वाढले आणि किंमत आटोक्यात आली. 

ऑलिम्पस कंपनी काही वर्षांतच आंतरराष्ट्रीय ख्यातीची कॅमेरा निर्मिती करणारी कंपनी झाली. अनेक सेलिब्रेटी आणि प्रख्यात फोटोग्राफर ऑलिम्पसच्या कॅमेऱ्याची जाहिरात करू लागले. टीव्हीवर जाहिरात करणारी कॅमेरा कंपनी अशी ऑलिम्पसची १९७० मध्येच ओळख निर्माण झाली. कॅमेरा क्षेत्रातला सर्वोत्तम ब्रँड झालेल्या ऑलिम्पस कंपनीने लोकप्रियतेची शिखरे चढायला सुरुवात केली. ऑलिम्पसचे मिररलेस आणि हाताळण्यासाठी सोपे असलेले कॅमेरे हौशी फोटोग्राफर, कौटुंबिक आनंदाचे क्षण टिपणारी मंडळी अशांच्या पसंतीस उतरले. 

मागील ३ वर्षांपासून तोट्यात होती कंपनी

फोटोग्राफीची कला सामान्यांच्या हाती आणून देणाऱ्या ऑलिम्पसला डिजिटल कॅमेरा तंत्रज्ञान धक्का देणार असे वाटत होते. पण ऑलिम्पस कंपनीने डिजिटल कॅमेरा निर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश करुन व्यवसाय टिकवून ठेवला. मात्र मोबाइलमुळे कॅमेरा आणखी छोटा आणि अधिकाधिक क्षमतेचा होत गेला. मोबाइल कॅमेऱ्यामुळे फोटोग्राफीचे तंत्रज्ञान सोपे आणि खिशाला परवडणारे झाले. सामान्यांना क्षणार्धात फोटो काढून मोबाइलवरील सॉफ्टवेअरमुळे एडिट करणे, इफेक्ट देणे सोपे झाले. हे तंत्र आवाक्यात येऊ लागल्यामुळे ऑलिम्पस कंपनीच्या कॅमेरा विक्रीवर परिणाम झाला. मागील तीन वर्षांपासून कंपनीला तोटा होत होता.

वैद्यकीय संशोधनाशी संबंधित सुक्ष्म कॅमेरा उपकरणांचा निर्मिती करणार

कोरोना संकटामुळे तर पुन्हा उभारी घेण्याच्या सर्व शक्यता धुळीस मिळाल्या आणि ऑलिम्पस कंपनीने कॅमेरा निर्मितीचे व्यवसायाचे शटर डाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला. कॅमेरा निर्मिती थांबवली तरी मायक्रोस्कोप निर्मितीचा मूळ उद्योग यापुढेही सुरू राहणार असल्याचे ऑलिम्पस कॉर्पोरेशनने जाहीर केले. कॅमेऱ्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली असली तरी मायक्रोस्कोप निर्मिती हा समुहाचा मूळ व्यवसाय आहे, असेही ऑलिम्पस कॉर्पोरेशनने जाहीर केले. यापुढे मायक्रोस्कोप आणि वैद्यकीय संशोधनाशी संबंधित इतर अनेक सुक्ष्म कॅमेरा उपकरणांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रीत करणार असे ऑलिम्पस कॉर्पोरेशनने जाहीर केले. 

कॅमेराप्रेमींनी व्यक्त केले दुःख

ऑलिम्पस कॅमेरा बंद होणार हे समजल्यावर अनेक कॅमेराप्रेमींनी दुःख व्यक्त केले, तर काहींनी व्यवसाय अडचणीत सापडण्यासाठी ऑलिम्पसच्या व्यवस्थापनाचे काही चुकीचे निर्णय कारणीभूत ठरल्याचा आरोप केला. कौटुंबिक सोहळ्याचे क्षण टिपण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॅमेऱ्यांची जागा स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याने घेतली आहे. मात्र व्यावसायिक वापरासाठी लेन्सचे डीएसएलआर कॅमेरे आजही वापरले जात आहेत. या व्यवसायावर विशेष परिणाम झालेला नाही. ऑलिम्पस कंपनीने डीएसएलआर प्रकारात आधुनिक कॅमेरा निर्मितीवर भर देऊन मर्यादीत निर्मिती सुरू ठेवली असती तर कंपनी कारभार सुरू ठेवू शकली असती, असे कॅमेराप्रेमींचे मत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी