लॉकडाऊनमध्ये ही कंपनी दुरुस्त करून देते फोन, टॅबलेट, तेही घरबसल्या

गॅजेट फिव्हर
Updated Apr 26, 2021 | 15:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

या सुविधेअंतर्गत तुम्ही आपला फोन आणि टॅबलेट घरबसल्याच दुरुस्त करू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला थोडेसे पैसे खर्च करावे लागतील.

Samsung Home service for smartphone, tablet
सॅमसंगची स्मार्टफोन, टॅबलेटसाठी नवी होम सर्व्हिस 

थोडं पण कामाचं

  • सॅमसंगची नवी होम सर्व्हिस
  • स्मार्टफोन, टॅबलेट दुरुस्त करा घरबसल्या
  • माफक शुल्कात सेवा उपलब्ध

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. देशभर अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांना घरातच राहावे लागते आहे. तर नोकरदार वर्ग वर्क फ्रॉम होम करतो आहे. अशा वेळी आपल्या फोन, टॅबलेट आणि लॅपटॉपच्या मदतीने लोक काम करत आहेत. मात्र अशा परिस्थितीत जर तुमचा फोन किंवा टॅबलेट बिघडला तर तुमच्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते. कारण दुकानांवरदेखील निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व्हिस सेंटर उपलब्ध होणे अवघड आहे. 

सॅमसंगची नवी होम सर्व्हिस

ही परिस्थिती लक्षात घेऊनच सॅमसंगने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त सेवा देण्यास सुरूवात केली आहे. या सेवेमुळे तुम्ही घरबसल्याच आपला फोन दुरुस्त करू शकता. सॅमसंगने अलीकडेच आपल्या ग्राहकांसाठी कॉन्टॅक्टलेस सर्व्हिसअंतर्गत मोबाईल फोनसाठी नवी पीक अप आणि ड्रॉप सेवा सुरू केली आहे. ज्या ग्राहकांचा फोन खराब झाला आहे असे ग्राहक या सर्व्हिसचा लाभ घेऊ शकतात आणि आपला फोन घरबसल्या दुरुस्त करून घेऊ शकतात. याशिवाय जर तुमचा फोन सर्व्हिस सेंटरवर आहे आणि तुम्हाला तो घरी मागवायचा आहे तर तुम्ही ड्रॉप ओन्ली सुविधेचा लाभ घेत घरपोच फोन मागवू शकता.

४६ शहरांमध्ये मिळते ही सेवा


मोबाईल फोनच्या पीक अप आणि ड्रॉपची ही सेवा ४६ शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली, गुडगाव, मुंबई, कोलकाता, चेन्नई, पुणे, बंगळूरू, लखनौ, वाराणसी, देहरादून, गुवाहाटी, भुवनेश्वर, पटना, दुर्गापूर, रांची, ठाणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, सूरत, बडोदा, भोपाल, अहमदाबाद, गाजियाबाद, फरिदाबाद, नॉयडा, चंदीगठ, तिरुपती, हुबळी, हैदराबाद, विजयवाडा, लुधियाना, जालंधर, जयपूर, आग्रा, जोधपूर, इंदूर, रायपूर, राजकोटी मदूराई, कोईंबतूर, कालिकत इत्यादी शहरांचा समावेश आहे. या शहरांमधील नॉन कंटेनमेंट झोनच्या बाहेर असणाऱ्या विभागांना ही सेवा देण्यात येईल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 

या फोनसाठी मिळेल ही सेवा


Galaxy A, Galaxy M, Galaxy S, Galaxy F, Galaxy Note आणि  Galaxy Fold Seriesच्या स्मार्टफोनशिवाय टॅबलेटच्या दुरुस्तीसाठी ही सेवा उपलब्ध आहे. यासाठी नोंदणी करावी लागते. ग्राहकांच्या घरून फोन किंवा टॅबलेट पीक अप करताना आणि ड्रॉप करताना कर्मचारी सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करणार आहेत.

सर्व्हिससाठी इतका येईल खर्च


जर तुम्हाला या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर पीक आणि ड्रॉपसाठी तुम्हाला १९९ रुपये आणि फक्त ड्रॉप ओन्लीसाठी ९९ रुपयांचे शुल्क भरावे लागेल. यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पेमेंट गेटवेचा वापर करून पेमेंट करू शकता.
 

लॉकडाऊनमध्ये नागरिकांना घरातच राहावे लागत असल्यामुळे अनेक कंपन्या घरपोच सुविधा किंवा सेवा पुरवत आहेत. त्यातच डिजिटल सेवा किंवा डिजिटल सुविधांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लॉकडाउनमुळे निर्माण झालेली स्थिती आणि स्पर्धकांनी पुरवलेल्या सेवा लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी घरपोच सेवा सुरू केल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी