World first rollable TV: 65 इंचीचा जगातील पहिला रोलेबल टीव्ही 'या' कंपनीने केला लाँच 

LG Signature OLED TV R: एलजी इलेक्ट्रॉनिक्सने या उद्योगाचा पहिला रोलेबल टीव्ही बाजारात आणला आहे. कंपनीने या टीव्हीचे नाव एलजी सिग्नेचर ओएलईडी आर ठेवले आहे.

 LG_Signature_OLED_TV_R
worlds first rollable 65 inch display tv lg signature oled r launched   |  फोटो सौजन्य: Twitter

सियोल (दक्षिण कोरिया): दक्षिण कोरियाची आघाडीची घरगुती उपकरण निर्माता एलजी इलेक्ट्रॉनिक्सने पहिलावहिला रोलेबल टीव्ही बाजारात आणला असून त्याची किंमत तब्बल ६४ लाख रुपये आहे. एलजीने नुकताच हा टीव्ही आपल्या देशांतर्गत बाजारात आणला आहे. एलजीने म्हटले आहे की, जगातील पहिल्या रोलेबल टीव्हीचं परदेशी लाँचिंग अद्याप निश्चित झालेलं नाही. कारण प्रत्येक देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता निर्णय घेतला जाईल.

एलजीने आपल्या या टीव्हीचे नाव एलजी सिग्नेचर ओलेड आर (LG Signature OLED TV R)ठेवलं आहे. इथे आरचा अर्थ हा क्रांतिकारी (Revolutionary)असा घेण्यात आला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांना हाय-एंड टीव्ही मार्केटमध्ये आपली उपस्थिती बळकट करायची आहे. त्यामुळेच कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

योनहॅप न्यूज एजन्सीच्या मते, एलजीने अलीकडेच एक वेबसाइट सुरू केली आहे. जी विशेषत: सिंग्नेचर ओएलईडी आर साठी डिझाइन केलेली आहे. ही वेबसाइट व्हीव्हीआयपी ग्राहकांकडून प्री-ऑर्डर मिळविण्यासाठी डिझाइन केली गेली आहे.

रोलेबल टीव्ही हा 65 इंचीचा आहे आणि तो एका बॉक्समधून बाहेर येईल. तसेच, तो वापरल्यानंतर पुन्हा बॉक्समध्ये रोल केला जाऊ शकतो. हा टीव्ही मागील वर्षी अमेरिकेत आयोजित कस्टम इलेक्ट्रॉनिक्स शो दरम्यान सादर करण्यात आला होता.

दरम्यान, अशाप्रकारचा टीव्ही आणण्याचा हा एलजीचा पहिलाच प्रयत्न आहे. सध्या तरी या टीव्हीची किंमत प्रचंड आहे. मात्र, येत्या काळात अशा स्वरुपाचे अनेक टीव्ही आपल्याला बाजारात पाहायला मिळू शकतात. त्यामुळे त्याच्या किंमतीमध्ये देखील फरक पडू शकतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी