FAU-G: कधी रिलीज होणार ही स्वदेशी अॅक्शन गेम? पहिल्या भागासह या गेमचे तपशील जाणून घ्या

फोना-फोनी
Updated Oct 26, 2020 | 13:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

FAU-G game release in India: पबजी या प्रसिद्ध मोबाईल गेमवर बंदी आल्यानंतर चर्चेत आलेली फौजी ही स्वदेशी अॅक्शन गेम कधी रिलीज होणार आणि कसा असेल याचा पहिला भाग? जाणून घ्या या गेमचे सर्व तपशील इथे.

FAU-G action game
FAU-G: कधी रिलीज होणार ही स्वदेशी अॅक्शन गेम? पहिल्या भागासह या गेमचे तपशील जाणून घ्या 

थोडं पण कामाचं

  • काय आहे फौजीचा संपूर्ण अर्थ?
  • कधी प्रदर्शित होणार फौजी अॅक्शन गेम?
  • एनकोर गेम्स करत आहे आणखी दोन गेम्सवर काम

मुंबई: FAU-G game release in India: भारतात (India) पबजी या मोबाईल गेमवर बंदी आल्यानंतर (ban on PUB-G game) एनकोअर (n-Core) या भारतीय कंपनीने (Indian company) तयार केलेली फौजी ही गेम (FAU-G game) चर्चेत आली होती. पबजी मोबाईल म्हणजेच बॅटल रॉयल गेम (Battle Royal Game) खेळणाऱ्यांसाठी भारतीय कंपनी एक नवी अॅक्शन गेम (new action game) घेऊन येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या गेमवर काम चालू आहे.

काय आहे फौजीचा संपूर्ण अर्थ?

अनेक लोकांना असा प्रश्न पडत आहे की फौजी या नावाचा नेमका अर्थ काय आहे. खरेतर फौजी हे संक्षिप्त रूप आहे. या नावाबाबत उत्सुकता असणाऱ्यांसाठी या गेमचे संपूर्ण नाव आहे Fearless And United: Guards. याचे संक्षिप्त रूप म्हणजेच FAU-G किंवा फौजी. पबजी या गेमला पर्याय म्हणून फौजी या गेमकडे पाहिले जात आहे, मात्र विशाल गोंडाल यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे की ही गेम पबजीशी स्पर्धा करणार नाही.

कधी प्रदर्शित होणार फौजी अॅक्शन गेम?

पबजीवर बंदी आल्यानंतर चर्चेत आलेली ही गेम प्रदर्शित कधी होणार याबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे. भारतीय गेम डेव्हलपिंग कंपनी एनकोर गेम्सचे सहसंस्थापक विशाल गोंडाल यांनी दिलेल्या माहितीनुसार ही गेम सध्या पाईपलाईनमध्ये आहे आणि कंपनी ही गेम ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित करणार आहे. या गेमवर मे-जून महिन्यापासून काम चालू आहे. ही गेम ऑक्टोबरच्या शेवटी प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनाची नेमकी तारीख अद्याप कळलेली नाही.

FAU-G गेमचा पहिला भाग

विशाल गोंडाल यांनी या गेमबद्दल काही तपशील सांगितले आहेत. त्यांनी सांगितले आहे की या गेमचा पहिला भाग हा गलवान खोऱ्यातील घटनांवर आधारित असेल. या गेममधून खेळणाऱ्यांचे फक्त मनोरंजनच होणार नाही, तर सैनिकांच्या बलिदानाबद्दल त्यांना माहितीही मिळेल. या वर्षीच्या जून महिन्यात गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांदरम्यान खडाजंगी झाली होती. या गेममधून होणाऱ्या कमाईचा २०% नेट रेव्हेन्यू भारत के वीर या ट्रस्टला मिळणार आहे.

एनकोर गेम्स करत आहे आणखी दोन गेम्सवर काम

विशाल गोंडाल हे एनकोर गेम्सचे अन्य दोन सहसंस्थापक दयानिधी एम. जी. आणि गणेश हेगडे यांच्यासह तीन गेम्स प्रदर्शित करणार आहेत. यातील एक गेम ही फौजी ही अॅक्शन गेम आहे. दुसरी गेम क्रिकेट तर तिसरी गेम ही संगीताशी संबंधित असणार आहे. या दोन गेम्सच्या नावांबद्दल मात्र अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी