ओप्पोने भारतात लॉंच केला सर्वात स्वस्त ५ जी फोन, फक्त १४,९९० रुपयांत

फोना-फोनी
Updated Apr 27, 2021 | 20:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतीय बाजारपेठेत सर्वात स्वस्त ५ जी फोन (Oppo A53s 5G) लॉंच करण्याच्या स्पर्धेत ओप्पोने कदाचित रिअलमी वर मात केली आहे.

cheapest 5 G phone in India
ओप्पो ए५३एस ५जी फक्त १४,९९० रुपयांना 

थोडं पण कामाचं

  • ओप्पोने भारतात आणला सर्वात स्वस्त ५ जी फोन
  • ओप्पो ए५३एस ५जी मध्ये आहे डायमेन्सिटी ७०० एसओसी
  • ओप्पो ए५३एस ५जी मध्ये आहे ५००० एमएएच बॅटरी

नवी दिल्ली : भारतात ५ जी चे वारे वाहू लागले आहेत. ५ जी सेवेच्या चाचण्या या वर्षाअखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. अशातच मोबाईल कंपन्यांनी ५ जी मोबाईल लॉंच करण्याच्या स्पर्धेत उडी घेतली आहे. रिअलमी पाठोपाठ आता ओप्पेनेदेखील भारतीय बाजारपेठेत ५जी मोबाईल फोन लॉंच केला आहे. 

ओप्पो ए५३एस ५जी मोबाईल फोन


ओप्पो ए५३एस ५जी  (Oppo A53s 5G)भारतात लॉंच झाला आहे. हा ओप्पो कंपनीचा भारतातील सर्वात स्वस्त ५जी मोबाईल फोन आहे. नवा ए५३एस ५जी हा मागील वर्षी लॉंच झालेल्या ए५३एस श्रेणीतील मोबाईलची ५जी आवृत्ती आहे. काही दिवसांपूर्वीच रिअलमी ८ ५जू लॉंच झाला होता. त्यानंतर आलेला ए५३एस ५जी हा मोबाईल फोन ५जी मोबाईल श्रेणीतील सर्वात स्वस्त फोनपैकी एक आहे. ओप्पो ए५३एस ५जी मध्ये मीडियाटेक डायमेसिटी ७०० प्रोसेसर आहे. हाच प्रोसेसर रिअलमी ८ ५जी मध्ये देखील आहे.

'भारतात नवा ५ जी फोन लॉंच करताना आम्हाला खूप उत्साह वाटतो आहे. नव्या ओप्पो ए५३एस ५जी मोबाईल फोनमध्ये सर्व पॉवरफुल फिचर्स आहेत. त्यामुळे तुमचा फोन फक्त दिवसभर चालणार नाही तर तो ५ जी नेटवर्कसाठीही तयार आहे. यामध्ये असणारी स्टोरेज क्षमता मोठी आहे आणि तुम्ही तुमचे मनोरंजन एन्जॉय करू शकाल', असे मत ओप्पो इंडियाचे मार्केटिंग प्रमुख दमयंत सिंह खानोरिया यांनी व्यक्त केले आहे. 

ओप्पो ए५३एस ५जी भारतात


नव्या ओप्पो ए५३एस ५जी मोबाईल फोनची किंमत १४,९९० रुपये आहे. हा भारतातील सर्वात स्वस्त ५जी मोबाईल फोन आहे. रिअलमीच्या ८ ५जी पेक्षा तो फक्त ९ रुपयांनी स्वस्त आहे. रिअलमीने अलीकडेच ८ ५जी मोबाईल फोन लॉंच केला होता. या फोनची किंमत १४,९९९ रुपये आहे. ओप्पोचा ओप्पो ए५३एस ५जी फोन दोन श्रेणींमध्ये आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत १४,९९० रुपये आहे तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज क्षमता असणाऱ्या फोनची किंमत १६,९९० रुपये आहे. यामध्ये क्रिस्टल ब्ल्यू आणि इंक ब्लॅक असे दोन रंग उपलब्ध आहेत. ओप्पो ए५३एस ५जी हा फोन फ्लिपकार्ट आणि रिटेल स्टोअर असा दोन्हीकडे उपलब्ध असणार आहे.

ओप्पो ए५३एस ५जीची खासियत


या नव्या फोनमध्ये ६.५२ इंची एचडीप्लस एलसीडी डिस्प्ले आहे. त्यात टिअरड्रॉप स्टाईल नॉच आहे आणि फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशो ८९ टक्के आहे. फोनच्या डिस्प्लेमध्ये ऑल डे एआय आय कम्फर्ट फिचर आहे. या फोनमध्ये पॉलीकार्बोनेट वापरण्यात आल्यामुळे यात क्रॅक पडण्याची शक्यता कमी आहे. या फोनचे वजन १८९.६ ग्रॅम असून याची जाडी फक्त ८.४ मीमी आहे.

ओप्पो ए५३एस ५जी मध्ये ऑक्टा कोअर मीडियाटेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसर आहे. यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे. शिवाय मायक्रोएसडी कार्ड वापरून ही क्षमता वाढवलीदेखील जाऊ शकते. ओप्पोने नवीन लिंकबूस्ट तंत्रज्ञान आणले असून त्यामुळे हा फोन वाय फाय आणि ५ जी सिग्नल या दोघांनाही सहजपणे जोडला जातो. त्यामुळे या फोनमध्ये तुम्ही अनेक कामे एकावेळी सहजपणे करू शकता. भारतात व्यावसायिकरित्या ५ जी सेवा उपलब्ध होईपर्यत तुम्ही या फोनमध्ये ४जी आणि एलटीई सेवा वापरू शकता. 

ओप्पो ए५३एस ५जी चा कॅमेरा


नव्या फोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे, सोबत जोडीला २ मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर आणि पोट्रेट सेन्सर आहे. या कॅमेराद्वारे तुम्ही अल्ट्रा क्लिअर १०८ मेगापिक्सेल फोटो काढू शकता. यात फोटोग्राफीसाठी अल्ट्रा नाईट मोडदेखील आहे. या फोनमध्ये ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, अल्ट्रा नाईट सेल्फी फिचरसोबत देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी ५००० एमएएच असून त्याची क्षमता ३७.८ तासांच्या टॉक टाईमची आणि १७.७ तासांच्या व्हिडिओ प्लेबॅकची आहे. फोनमध्ये मोनो स्पीकर असून ३.५ मीमी चा हेडफोन जॅक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी