5G Call In India: नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारतअतंर्गत (Aatmanirbhar Bharat) देशाने पुन्हा एकदा प्रगतीच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे. देशात प्रथमच 5G कॉलची (5G Call) यशस्वी चाचणी घेण्यात आली. आयआयटी मद्रासच्या (IIT Madras) नेतृत्त्वात ही चाचणी घेण्यात आली. या नेटवर्कचे (5G Network) संपूर्ण डिझाइन भारतामध्येच विकसित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, हे नेटवर्क विकसित करण्यासाठी एकूण 8 इन्स्टिट्यूटची मदत घेण्यात येत आहे. आयआयटी मद्रासच्या नेतृत्त्व हे काम सुरू आहे. आयआयटी दिल्ली, आयआयटी मुंबई, आयआयटी हैदराबाद, आयआयटी कानपूर, सोसायटी फॉर अॅप्लाइड मायक्रोव्हेव इलेक्ट्रानिक्स इंजीनियरिंग अॅण्ड रिसर्च (SAMEER), सेंटर ऑफ अॅक्सिलेन्स इन वायरलेस टेक्नॉलॉजी (CEWiT) आणि आयआयएससी बंगळुरुचे सहकार्य मिळत आहे.केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटर आणि कू अॅपवर याबाबत माहिती दिली. या नेटवर्कचे संपूर्ण डिझाइन भारतामध्येच विकसित करण्यात आले असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 5G नेटवर्कवरून व्हिडिओ कॉल देखील केला.
5G Call च्या यशस्वी चाचणीनंतर केंद्रीय मंत्री म्हणाले, ‘IIT मद्रासच्या चमूचा आम्हाला खूप अभिमान आहे. 5G चाचणी पॅड विकसित केले आहे. ते संपूर्ण 5G नेटवर्क आणि हायपरलूप प्रोजेक्टसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या संपूर्ण प्रोजेक्टसाठी 220 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. वर्ष अखेरीस 5G टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे. दरम्यान, अश्विनी वैष्णव यांनी एक दिवस आधीच याबाबत सूचक वक्तव्य केले होते. यंदा सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत भारत स्वत:चं 5G नेटवर्क तयार करेन, असे केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सांगितले होते. 21व्या शतकातील कनेक्टिव्हिटी देशाच्या प्रगतीचा वेग ठरवेल, असेही ते म्हणाले होते. दरम्यान, 5G च्या माध्यमातून देशात सुमारे 1.5 लाखांहून जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRIA) रौप्य महोत्सवी समारंभाला संबोधित करताना म्हणाले होते, की येत्या दीड वर्षात 5G नेटवर्क देशाच्या अर्थव्यवस्थेत 450 अब्ज रुपयांचे योगदान देणार आहे. यामुळे देशाच्या प्रगतीला मोठा हातभार लागणार आहे. तसेच रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. या दशकाच्या अखेरीस सुरू होणार्या 6G सेवेसाठी टास्क फोर्सने काम सुरू केले आहे. यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे देखील पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.