ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, १ एप्रिलपासून महागणार वोडाफोन, आयडियाच्या ‘या’ सेवा

फोना-फोनी
Updated Feb 28, 2020 | 17:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. १ एप्रिलपासून टेलिकॉम कंपनीच्या काही सर्व्हिस महागणार आहेत. याचा थेट परिणाम कंपनीच्या ग्राहकांवर पडणार आहे. जाणून घ्या कोणत्या सेवा महागणार...

Vodafone Recharge Plan
अबब! १ एप्रिलपासून महागणार वोडाफोन, आयडियाच्या ‘या’ सेवा 

थोडं पण कामाचं

  • १ एप्रिलपासून महागणार वोडाफोन-आयडियाच्या सेवा, एजीआरची थकबाकी भरण्यासाठी मागितला १८ वर्षांचा काळ
  • हायकोर्टाच्या आदेशानुसार वोडाफोन-आयडियावर जवळपास ५३ हजार कोटी रुपयांची एजीआर थकबाकी आहे.
  • सरकारी दूरसंचार कंपन्यांच्या महसूलाच्या आधारावर लायसेंस फी आणि स्पेक्ट्रम वापराची फी वसूल केली जात असते.

नवी दिल्ली: टेलिकॉम कंपनी वोडाफोन-आयडियानं मोबाईल डेटासाठीची फी वाढवून कमितकमी ३५ रुपये प्रति GB करण्याची मागणी केली आहे. ही फी सध्याच्या फीच्या सात ते आठ पटीनं अधिक आहे. कंपनीनं यासोबतच एका ठराविक मासिक फी सोबत कॉल सेवांसाठी ६ पैसे प्रति मिनिटांचे दर ठरवण्याची मागणी केलीय. कंपनीनं म्हटलंय की, त्यांना एजीआरची थकबाकी फेडण्यासाठी आणि कंपनीचा व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी १ एप्रिलपासून हे नवीन दर लागू करणं आवश्यक आहे.

एजीआरची थकबाकी भरण्यासाठी मागितला १८ वर्षांचा वेळ

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीनं एजीआरची थकबाकी भरण्यासाठी १८ वर्षांची वेळ मागितली आहे. यासोबतच कंपनीनं म्हटलंय की, त्यांना व्याज आणि दंडातून तीन वर्षांची सूट मिळाली पाहिजे.

५३ हजार कोटींची एजीआर थकबाकी

हायकोर्टाच्या आदेशानुसार वोडाफोन-आयडियावर जवळपास ५३ हजार कोटी रुपयांची एजीआर थकबाकी आहे. कंपनीनं आतापर्यंत दूरसंचार विभागाला फक्त ३५०० कोटी रुपये दिलेले आहेत. एका अधिकाऱ्यानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं की, ‘वोडाफोन-आयडियानं सेवेत राहण्यासाठी सरकारकडे अनेक मागण्या केल्या आहेत. कंपनीला १ एप्रिल २०२० पासून मोबाईल डेटाचे दर कमीतकमी ३५ रुपये प्रति जीबी आणि कमीतकमी ५० रुपयांची मासिक कनेक्शन फी ठरवावी. या खूप कठीण मागण्या आहेत आणि त्या मान्य करणं सरकारसाठी कठीण आहे.’

कॉल रेट ६ पैसे करण्याची मागणी असल्याचं सूत्रांकडून कळतंय. कॉल सेवांसाठी कमीतकमी सहा पैसे प्रति मिनीटांचे दर ठरवले गेले पाहिजे. कंपनीनं ही मागणी अशावेळी केलीय, जेव्हा कंपनीनं गेल्या तीन महिन्यांमध्ये पहिलेच मोबाईल सेवांच्या किमती ५० टक्क्यांनी वाढवल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कंपनीनं मोबाईल कॉल आणि डेटाच्या किमती वाढवल्यास त्यांना तेव्हढी कमाई करता येईल, जितकी २०१५-२०१६ मध्ये आयडिया आणि वोडाफोन वेगवेगळ्या कमावत होत्या.’

दंडाची रक्कम भरण्यात तीन वर्षांची सूट देण्याची मागणी

कंपनीच्या मते, त्यांना कमाईची ती उंची गाठण्यासाठी तीन वर्ष लागतील. याच कारणामुळे एजीआरकडे दंड आणि व्याजाच्या थकबाकीमध्ये तीन वर्षांची सूट द्यावी, अशी मागणी कंपनीनं केलीय. वोडाफोन-आयडियाच्या एक प्रवक्त्यानं याबाबतीत काहीही बोलण्यास नकार दिलाय. सरकारी दूरसंचार कंपन्यांच्या महसूलाच्या आधारावर लायसेंस फी आणि स्पेक्ट्रम वापराची फी वसूल केली जात असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी