नवी दिल्ली: व्हॉट्सऍप हे मेसेजींगसाठी वापरले जाणारे सर्वात लोकप्रिय ऍप्लिकेशन आहे. त्यामुळे सर्व सायबर क्राईम करणारे काही फ्रॉड करायचा असेल तर याच ऍप्लिकेशनचा वापर सर्वात जास्त करतात. या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर आता महिलादिनाच्या निमित्ताने एक मेसेज शेअर केला जात आहे. या मेसेजनुसार बुट बनवणारी आदीदास ही कंपनी महिलांना फ्रीमध्ये बुट देण्याचा दावा करत आहे. परंतु, अशाप्रकारचा कसलाच दावा या कंपनीकडून करण्यात आलेला नाही.
व्हॉट्सऍपवर दररोज असे खोटे किंवा फ्रॉड मेसेज येत असतात. अनेक लोक असे मेसेज फॉरवर्डही करतात. परंतु, अशा मेसेजमध्ये काही तथ्य असत नाही. या खोट्या मेसेजच्या निमित्ताने वापरकर्त्यांची माहिती घेऊन त्यांना फसवणे हा या अशा मेसेजेसच्या पाठीमागचा उद्देश असतो. त्यामुळे तुम्हाला जर अशा प्रकारचा एखादा मेसेज आला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून तो डिलीट करून टाका.
व्हॉट्सऍपवरील अशा मेसेजसोबत एक लिंक शेअर केली जात आहे. त्यावर क्लिक केल्या केल्या तुम्ही एखाद्या थर्ड पार्टी पेजवर जाता आणि तेथे हा संदेश लिहिलेला दिसतो की, आदीदास महिला दिनाच्या निमित्ताने दहा लाख बुट फुकटात वाटत आहे. यात काही बारीक गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. जसे की या मेसेजमध्ये 'Adidas' ची स्पेलिंग 'Adidass' लिहिली आहे. जे अत्यंत चुकिचे आहे.
लिंक उघडल्यावर एक पेज उघडते ज्यात तुम्हाला शुभेच्छा दिल्या जातात आणि तुमच्याकडे महिला दिनाच्या निमित्ताने आदिदासचा बुट मिळवण्याची संधी आहे असे लिहिलेले असते. पेजवर त्या बुटांचा एक फोटोही अपलोड केलेला असतो. पेजच्या वरच्या बाजूला आदिदासचा लोगो, किंमत आणि ते घेण्यासाठीचे बटन दिलेले असते. परंतु, हे दाबता येत नाही. त्यामुळे अशा फ्रॉड मेसेजपासून दूर रहा आणि सायबर गुन्ह्याविरोधात उभे रहा.