नवी दिल्ली : सायबर गुन्हे आणि स्मार्टफोनचा केला जाणारा गैरवापर याला पायबंद घालण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (Telecom Regulatory Authority of India) अर्थात ट्राय (TRAI) एक भारी उपाय सुरू करणार आहे. आता फोन करताच यूजर्सच्या स्मार्टफोन (Smartphone) स्क्रिनवर कॉलरचं नाव (Caller Name) दिसू शकणार आहे. दरम्यान या नवीन यंत्रणेच्या उभारणीवर ट्राय काम करत आहे. सध्या, एखाद्या व्यक्तीचा संपर्क क्रमांक जर युजरने त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह केला असेल तरच त्या व्यक्तीचं नाव दिसत असतो.
एका वृत्तसंस्थेने एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा हवाला देत दिलेल्या माहितीनुसार, फोन स्क्रीनवर कॉलरचं केवायसीवर (KYC) आधारित नाव फ्लॅश व्हावं, यासाठी यंत्रणा उभारण्याकरिता ट्राय लवकरच काम सुरू करणार आहे. 'केवीयसी'वर आधारित कॉलर आयडेंटिफिकेशन यंत्रणेमुळे (Call Identification mechanism) यूजर्सचं स्पॅम कॉल (Spam Call) आणि फसवणुकीच्या वाढत्या घटनांपासून संरक्षण होऊ शकेल,' असं तज्ज्ञांनी ट्रायला सांगितले आहे.
जर एखादा नंबर युजरने फोनमध्ये सेव्ह केला नसेल तरी कॉलर कोण आहे हे युजर्सला ट्रु-कॉलर्ससारख्या (True caller) अॅप्सच्या मदतीनं जाणून घेता येतं. या अॅपवरचा बहुतेक डाटा हा क्राउडसोर्स केलेला असल्यानं काही मर्यादा निश्चितच आहेत. या प्रकरणावर तोडगा काढण्याची शिफारस दूरसंचार विभागाकडून (DoT) ट्रायला करण्यात आली आहे, असं त्या वृत्तात नमूद केलं आहे.
दरम्यान या नवीन यंत्रणेवर येत्या दोन महिन्यांत काम सुरू होईल`, असं ट्रायचे अध्यक्ष पी. डी. वाघेला यांनी सांगितलं. ते म्हणाले की, 'आम्हाला नुकतीच याबाबतची एक शिफारस प्राप्त झाली आहे आणि आम्ही यावर लवकरच काम सुरू करू. ही यंत्रणा काम करू लागल्यानंतर 'डीओटी'च्या नियमांनुसार आणि टेलिकॉम कंपन्यांनी केलेल्या 'केवायसी'नुसार या नव्या यंत्रणेच्या माध्यमातून फोनच्या स्क्रीनवर कॉलरचं नाव दिसू शकेल,' असं वाघेला यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
सरकार आणि स्मार्टफोन ओईएमच्या (Smartphone OEM) स्पॅम कॉल रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तरीही ते रोखणं अवघड होत आहे. कॉलरचं नाव दाखवणारी ही यंत्रणा सुरू झाली तर संपूर्ण कॉलिंग नेटवर्कमध्ये पारदर्शकता येणार आहे. सध्या ट्रायनं उचललेलं हे पाऊल शिफारशीच्या टप्प्यावर असल्यानं, ही यंत्रणा नेमकी केव्हा विकसित होऊन वास्तवात येणार हे अद्याप अस्पष्ट आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही वर्षंदेखील लागू शकतात.
दरम्यान, ईमेल स्टेटमेंटच्या माध्यमातून ट्रु-कॉलर या कॉलर आयडेंटिफिकेशन अॅपच्या प्रवक्त्यांनी या उपक्रमाचं स्वागत केलं आहे. स्पॅम आणि स्कॅम कॉल्सचा धोका संपुष्टात आणण्यासाठी फोन नंबर ओळखणं महत्त्वाचं आहे आणि ट्रु-कॉलर गेल्या 13 वर्षांपासून या महत्त्वपूर्ण मिशनसाठी सतत प्रयत्न करीत आहे. भविष्यातल्या सर्व उपक्रमांसाठी आम्ही त्यांना मदत करण्यास तयार आहोत,' असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.