याहू ग्रुप्स १५ डिसेंबरपासून बंद होणार

Yahoo Groups to shut down from December 15 याहू ग्रुप्स १५ डिसेंबर २०२० रोजी बंद होणार आहे, अशी घोषणा याहू ग्रुप्स सेवेचे मालक व्हेरिझोनने (Verizon) केली आहे

Yahoo Groups to shut down from December 15
याहू ग्रुप्स १५ डिसेंबरपासून बंद होणार 

थोडं पण कामाचं

  • याहू ग्रुप्स १५ डिसेंबरपासून बंद होणार
  • याहू ग्रुप्स बंद करुन नव्या सेवांवर लक्ष केंद्रीत करणार - व्हेरिझोन
  • याहू ग्रुप्स बंद झाले तरी याहू मेल सुरू राहणार

मुंबईः मागील काही वर्षांपासून सातत्याने युझरच्या संख्येत आणि वापराच्या प्रमाणात घट होत असल्यामुळे याहू ग्रुप्स (Yahoo Groups) ही सेवा बंद होणार आहे. याहू ग्रुप्स १५ डिसेंबर २०२० रोजी बंद होणार आहे, अशी घोषणा याहू ग्रुप्स सेवेचे मालक व्हेरिझोनने (Verizon) केली आहे (Yahoo Groups to shut down from December 15). अमेरिकेत (United States of America - USA) वायरलेस सेवा देणाऱ्या व्हेरिझोनने २०१७ मध्ये याहू कंपनी ४.८ अब्ज डॉलर मोजून खरेदी केली. या खरेदीमुळे याहूच्या सेवांचे अधिकार व्हेरिझोनकडे सुरक्षित आहेत.

याहू ग्रुप्सचा अॅक्सेस बंद होणार

जे युझर अद्याप याहू ग्रुप्सचा वापर करत आहेत त्यांनी त्यांचा डेटा डाऊनलोड करुन घ्यावा अथवा दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर करावा. जो डेटा डीलीट करायचा असेल तो डीलीट करावा. एकदा याहू ग्रुप्स बंद झाले की कोणत्याही युझरला याहू ग्रुप्सच्या सेवेचा अॅक्सेस मिळणार नाही, असे व्हेरिझोनने जाहीर केले. 

याहू ग्रुप्स बंद करुन नव्या सेवांवर लक्ष केंद्रीत करणार - व्हेरिझोन

जीमेल, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर अशा अनेक आधुनिक सेवा इंटरनेटवर विनामूल्य उपलब्ध असल्यामुळे मागील काही वर्षांमध्ये याहू ग्रुप्सचे महत्त्व आणि वापर कमी होत गेला. भविष्यात पुन्हा लोकप्रिय होण्याची शक्यता नसल्यामुळे व्हेरिझोनने याहू ग्रुप्स बंद करण्याचा निर्णय घेतला. याहू ग्रुप्स बंद करुन नव्या सेवांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे व्हेरिझोनच्यावतीने सांगण्यात आले. 

याहू ग्रुप्स २००१ पासून कार्यरत सेवा

याहू कंपनीने विचार, अनुभव आणि आठवणी यांची देवाणघेवाण करण्यासाठी याहू ग्रुप्सची निर्मिती केली. याहू ग्रुप्स ही सेवा २००१ पासून कार्यरत आहे. पण रेडिट, गूगल ग्रुप्स, फेसबुक ग्रुप्स यांच्या समोर टिकाव धरणे याहू ग्रुप्सला अशक्य झाले. अशातच स्मार्ट फोन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वेगाने होणारा विकास यांच्या गतीशी बरोबरी करण्यात याहू ग्रुप्स अपयशी ठरला. याच कारणामुळे याहू ग्रुप्स बंद होत आहे.

याहू ग्रुप्सवर १२ ऑक्टोबर २०२० पासून नव्या ग्रुपची निर्मिती बंद

याहू ग्रुप्सवर १२ ऑक्टोबर २०२० पासून नव्या ग्रुपची निर्मिती बंद झाली आहे. व्हेरिझोनच्या घोषणेनुसार याहू ग्रुप्स १५ डिसेंबर २०२० रोजी बंद होणार आहे. यानंतर कोणालाही याहू ग्रुप्सच्या वेबसाइटवर जाता येणार नाही. याआधी १७ जुलै २०१८ रोजी याहू मेसेंजर बंद करण्यात आले होते.

याहू ग्रुप्स बंद झाले तरी याहू मेल सुरू राहणार

याहू ग्रुप्स बंद झाले तरी याहू मेल (Yahoo Mail) सुरू राहणार आहे. युझर इ-मेल करण्यासाठी अथवा आलेले इ-मेल तपासण्यासाठी याहू मेलचा वापर करू शकतील. याहू ग्रुप्स बंद होण्याआधी ग्रुप मेंबरना केलेली इ-मेलची देवाणघेवाण आपल्या इ-मेल अकाउंटमध्ये सुरक्षित राहील. पण याहू ग्रुप्स बंद झाल्यावर ग्रुपशी संबंधित सेवा आपोआप बंद होतील. ग्रुप्समधील एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक इ-मेल आपल्याकडे असल्यास आपण संबंधितास स्वतंत्रपणे इ-मेल करू शकाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी