Rip Twitter: (कॅलिफोर्निया, अमेरिका): उद्योगपती एलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्रं हाती घेतल्यापासून ही कंपनी प्रचंड चर्चेत आहे. मस्क सतत कंपनीमध्ये काही विचित्र असे बदल करत आहेत. पण कंपनीच्या कर्मचार्यांपासून ते ट्विटरच्या यूजर्संना मस्कचे हे बदल फारसे आवडलेले नाहीत. (rip twitter trends elon musk shares picture of twitters grave)
मस्कने ब्लू टिक्ससाठी पैसे देण्याची घोषणा केल्यापासून अनेक सेलिब्रिटींनी ट्विटर बंद केलं आहे, तर मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणं आणि अनेक तास काम करण्याच्या मस्क यांच्या भूमिकेवर प्रचंड टीका होत आहे.
तसंच ट्विटर तात्काळ प्रभावाने काही काळासाठी त्यांची कार्यालये देखील बंद करत आहे. अशा परिस्थितीत ट्विटरवर #RIPTwitter ट्रेंड सुरु झालाय. ज्यावर लोक बरेच मीम्स शेअर करत आहेत.
स्वत: मस्कने देखील एक मीम शेअर केला आहे ज्यामध्ये तुम्ही 'ट्विटरची कबर' पाहू शकता.
खरं तर, अलीकडेच इलॉन मस्कने कोट्यवधी रुपये खर्च करुन ट्विटर आपल्या ताब्यात घेतलंय. त्यानंतर त्यांनी असे काही निर्णय घेतले की, ज्यामुळे ट्विटरवर गदारोळ झालाय.
आधी मस्कने ट्विटरच्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते, त्यानंतर आता काही कर्मचाऱ्यांनीच राजीनामा दिलाय. त्यामुळे #RIPTwitter, #GoodbyeTwitter, #TwitterDown सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.
ट्विटरच्या संदर्भात या गदारोळात काही यूजर्सनी मीम्सही शेअर केले आहेत. ज्यामध्ये युजर्सने ट्विटर बंद झाल्यानंतर आयुष्यातील आनंद वाढला असल्याचं म्हटलं आहे.
अशातच स्वत: मस्कने 'ट्विटरची कबर' असं एक मीम शेअर केल्याने एकूणच ट्विटर आणि मस्क यांच्याबाबत तुफान चर्चेला उधाण आलं आहे.
मस्क यांच्या या ट्विटला रिप्लाय करुन अनेकांनी भन्नाट मीम्स शेअर केले आहेत. भारतात देखील अनेक ट्विटर यूजर्स हे मस्क यांच्या मीम्सची खिल्ली उडवत आहेत.
आता मस्क यांचा ट्विटरची कबर शेअर करण्यामागचा नेमका हेतू काय?, यातून त्यांना नेमकं काय साध्य करायचंय असाच सगळ्यांना प्रश्न पडलाय. पण स्वत: मस्क यांनी या ट्विटबाबत अद्याप तरी कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर मस्क यांची खिल्लीच अधिक उडवली जात आहे.