हे तर नवं Twitter... पाहा काय आहे Mastodon

सोशल सॅव्ही
Updated Nov 08, 2022 | 17:46 IST

Mastodon: ट्विटरने अनेक धक्कादायक असे बदल सुरु केल्यानंतर आता अनेक यूजर्स हे याच प्रकारच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या शोधात आहेत. तसाच ऑप्शन आता यूजर्संना मिळाला आहे जाणून घ्या त्याविषयी.

थोडं पण कामाचं
  • अलीकडच्या काळात Mastodon या मायक्रोब्लॉगिंग साइटच्या यूजर्सची संख्या झपाट्याने वाढली
  • Mastodon सर्व्हर वेगवेगळ्या देशांमध्ये आणि थीमवर आधारित
  • अकाउंट बंद करण्यापूर्वी यूजर्सला तीन महिन्यांची नोटीस

Mastodon: ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर अ‍ॅलन मस्क यांनी तात्काळ ट्विटरमध्ये मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीलाच त्यांनी सब्सक्रिप्शनची घोषणा करुन ट्विटर यूजर्सला मोठा धक्का दिला आहे.  (why mastodon is becoming first choice for twitter users what is this microblogging site)

ज्यानंतर जगभरातील लोक इतर मायक्रोब्लॉगिंग साइट्सचा पर्याय शोधत आहेत. ट्विटर व्यतिरिक्त आता आणखी एक मायक्रोब्लॉगिंग साइट लोक मोठ्या प्रमाणात स्वीकारत आहेत. ज्याचं नाव Mastodon असं आहे. या सोशल नेटवर्कचे म्हणणे आहे की, अलीकडच्या काळात त्यांचे यूजर्स हे झपाट्याने वाढले आहेत. एका रिपोर्टनुसार, कंपनीचा हवाला देत असे म्हटले आहे की, सध्या 655,000 यूजर्स आहेत आणि यापैकी 230,000 यूजर्स हे गेल्या आठवड्यातच जोडले गेले आहेत.

काय आहे Mastodon? 

Mastodon ही मायक्रोब्लॉगिंग साइट अगदी ट्विटरसारखची दिसते. ज्यावर यूजर्स पोस्टही लिहू शकतात. त्याची पोस्ट 'टूट्स' म्हणून ओळखली जाते. या पोस्टवर कमेंट,रिप्लाय आणि रि-पोस्ट करता येणार आहे. या प्लॅटफॉर्मवर यूजर्स एकमेकांना फॉलो देखील करू शकतात. 

हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सहा वर्षे जुना आहे. पण अलीकडच्या काळात त्याच्या यूजर्सची संख्या झपाट्याने वाढली आहे. अचानक नवीन यूजर्स वाढल्याने कंपनीवर काहीसा दबाव देखील वाढणार असल्याचे बोलले जात आहे. Mastodon मध्ये अनेक सर्व्हर आहेत आणि ते थीम, देश आणि शहरांवर आधारित आहे.

हे सर्व्हर वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत. जेव्हा यूजर्स देश, थीम आणि शहर निवडतात तेव्हा एक कम्युनिटी तयार होते. यूजर्स हे थीम म्हणून सर्वाधिक सोशल आणि देश म्हणून युकेची निवड करत आहेत. 

UK मधील सुपीरियर नेटवर्कद्वारे Mastodon अ‍ॅप सर्व्हर चालवणारे रायन वाइल्ड म्हणतात की, त्यांना 24 तासांत 6,000 हून अधिक नोंदणी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानंतर त्यांना नोंदणीची प्रक्रिया थांबवावी लागली. 

Mastodon एका व्यक्तीच्या मालकीचे नाही

Mastodon हे कोणत्याही एका व्यक्तीच्या किंवा कंपनीच्या मालकीचे नाही. त्याचे वेगवेगळे सर्व्हर हे एकत्रितपणे एक सामूहिक नेटवर्क तयार करतात. हे सर्व्हर विविध लोक आणि संस्थांद्वारे नियंत्रित केले जातात. Mastodon ची ही खासियत त्याला लोकप्रिय आणि विश्वासार्ह बनवत आहे. Mastodon चे एक वैशिष्ट्य म्हणजे ते खाते बंद करण्यापूर्वी यूजरला तीन महिन्यांची नोटीस देते. 

ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी म्हणतात की, ते नवीन मायक्रोब्लॉगिंग साइट ब्लूस्कॉयवर काम करत आहेत. डोर्सी म्हणतात की, त्यांचे हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देखील Mastodon सारखे असेल.

ट्विटरच्या ब्लू टिकसाठी द्यावे लागतील पैसे 

अ‍ॅलन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ बनल्यानंतर मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे ट्विटरवर खळबळ उडाली आहे. ट्विटरचे सबस्क्रिप्शन असो किंवा कर्मचाऱ्यांची कपात, या सर्व गोष्टींमुळे लोकांमध्ये शंका निर्माण होत आहे. 

ट्विटरच्या वापरासाठी आता यूजर्सना पैसे मोजावे लागतील, असे मस्कने म्हटले आहे. तर आता भारतात ब्ल्यू टिकसाठी यूजर्संना $8 म्हणजेच सुमारे 660 रुपये दरमहा द्यावे लागतील. मस्कने वेगवेगळ्या देशांसाठी वेगवेगळे शुल्क निश्चित केले आहे. तसेच यूजर्सना नवीन फीचर्स देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

दरम्यान, या सगळ्यामुळे सर्वसामान्य यूजर्स हे ट्विटर सोडून झपाट्याने दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. ज्यामुळेच आता Mastodon हे प्रचंड चर्चेत आलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी