श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Reserarch Organisation) म्हणजेच इस्रोने अंतराळ क्षेत्रात एक मोठी कामगिरी केली आहे. दुपारी 3 वाजून 12 मिनिटांनी इस्रोने आपला 'अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाईट' (Earth Obervation Satellite) EOS-01चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन या स्पेस सेंटरवरुन EOS-01 सॅटेलाईटचे प्रक्षेपण करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसच्या काळात भारताने प्रथमच आपलं सॅटेलाईट अंतराळात प्रक्षेपण केलं आहे. पीएसएलव्ही-सी49 (PSLV-C49)च्या माध्यमातून EOS-01 आणि इतर 9 कमर्शिअल सॅटेलाईटचे अंतराळात प्रक्षेपण करण्यात आले. यासोबतच रिसॅट -2 बीआर-2 सह इतर वाणिज्यक सॅटेलाईट्सचं प्रक्षेपण अंतराळात करण्यात आलं. डिसेंबर 2020मध्ये पीएसएलव्ही सी-50 आणि जानेवारी 2021 मध्ये जीसॅट-12आर यांचं सुद्धा अंतराळात प्रक्षेपण केलं जाणार आहे.
ईओएस-01 (EOS-01) अर्थ ऑब्झर्व्हेशन रिसेट सॅटेलाईटचं अॅडव्हान्स सीरीज आहे. यामध्ये सिंथेटिक अॅपर्चर रडार (SAR) लावण्यात आले आहे. जे कुठल्याही वेळी आणि कुठल्याही वातावरणात पृथ्वीवर लक्ष ठेवू शकेल. या उपग्रहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याच्याद्वारे ढगांच्या आड असतानाही पृथ्वीवर लक्ष ठेवून स्पष्ट चित्र टिपले जाऊ शकते. याचा फायदा भारतीय लष्करालाही होणार आहे.
भारताने अंतराळात या उपग्रहाचे प्रक्षेपण केल्यामुळे पाकिस्तान आणि चीनची अवस्था खूपच बिकट झाली आहे. ईओएस-01 अंतराळातून असे फोटोज क्लिक करेल जे इतर उपग्रहांना शक्य नाहीये. हा उपग्रह सीमेवरील शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठीही प्रभावी ठरणार आहे. तसेच शत्रूंच्या हालचालींबद्दल अचूक माहिती देऊ शकेल. भारताने नुकताच अमेरिकेसोबत BECA करारावर स्वाक्षरी केली आहे ज्याद्वारे सीमेवर लक्ष ठेवण्यास मदत होईल.