OMG: २३ वर्षीय महिलेने दिला तब्बल ६ मुलांना जन्म

मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्हा रुग्णालयात शनिवारी एका २३ वर्षीय महिलेने तब्बल सहा मुलांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. 

23 year old woman gives birth to 6 children in sheopur district of madhya pradesh
OMG: २३ वर्षीय महिलेने दिला तब्बल ६ मुलांना जन्म  |  फोटो सौजन्य: Twitter

भोपाळ: मध्य प्रदेशमधील श्योपूर जिल्ह्यात एका २३ वर्षीय महिलेने काल (शनिवार) तब्बल ६ मुलांना जन्म दिला आहे. मात्र, त्यानंतर लगेचच दोन नवजात मुलांचा मृत्यू झाला. बडोदा येथील रहिवासी असलेल्या मूर्ती माळी यांनी ३५ मिनिटांमध्ये चार मुलं आणि दोन मुलींना जन्म दिला होता. या सर्व नवजात बालकांचं वनज देखील कमी होतं. यापैकी दोन मुलींचं वजन हे फक्त ३९० ग्रॅम आणि ४५० ग्रॅम इतकंच होतं. श्योपूर जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. आरबी गोयल यांनी ही माहिती दिली.

डॉक्टर म्हणाले, 'या सहाही बाळांचा जन्म हा महिलेच्या गर्भधारणेच्या २८ व्या आठवड्यात झाला होता. अत्यंत कमी वजन असलेल्या दोन मुलींचा जन्माच्या काही वेळातच मृत्यू झाला. दरम्यान, उर्वरित चार मुलांचे वजन ६१५ ग्रॅम ते ७९० ग्रॅमच्या दरम्यान आहे. या सर्व मुलांवर सिक न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये  उपचार सुरू करण्यात आले आहेत.

डॉ. गोयल म्हणाले की, 'सोमवारी सकाळी सोनोग्राफी केल्यानंतर आम्हाला समजलं की, ती तब्बल सहा मुलांना जन्म देणार असल्याचं समजले.' वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना भोपाळचे प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मीता अग्रवाल यांनी सांगितले की, 'ही एक दुर्मीळ बाब आहे. स्वाभाविकच, एकाच प्रसूतीत अनेक मुलांचा जन्म होणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. वंध्यत्वाच्या उपचारामुळे त्याची शक्यता वाढते, परंतु एखाद्या स्त्रीने सर्वसाधारणपणे सहा बाळांना जन्म दिला असेल तर ही घटना अत्यंत दुर्मिळ आहे.' 

सहा पैकी चार नवजात बालकांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं आहे. मात्र, उपचार सुरु असल्याने अद्याप महिलेला आपल्या बाळांना पाहता आलेलं नाही. दुसरीकडे या चार बालकांचा एकाच वेळी नेमका संभाळ कसा करायचा असाही प्रश्न बाळांच्या पालकांसमोर निर्माण झाला आहे. 

दरम्यान, एकाच महिलेने सहा मुलांना जन्म दिल्यामुळे सध्या संपूर्ण जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी