लिव-इनमधील गर्लफ्रेंडच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं असं काही की, तुम्हीही व्हाल हैराण

गुजरातमध्ये एका २३ वर्षीय तरुणाने आपल्या लिव-इन पार्टनरची परीक्षा घेण्यासाठी थेट स्वत:च्याच अपहरणाचा कट रचला. 

23 year old youth wants to testified love from girlfriend pretends to kidnap himself
लिव-इनमधील गर्लफ्रेंडच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं असं काही की, तुम्हीही व्हाल हैराण  |  फोटो सौजन्य: Thinkstock

थोडं पण कामाचं

  • लिव-इनमधील पार्टनरची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने रचला स्वत:च्या अपहरणाचा डाव
  • प्रेयसीकडे केली होती ३ लाख रुपयांची मागणी 
  • गुजरात पोलिसांनी प्रियकराच्याच मुसक्या आवळल्या 

अहमदाबाद: आपल्या लिव्ह-इन पार्टनरची परीक्षा घेण्यासाठी एका तरुणाने असं कृत्य केलं की, ज्यावर आपला विश्वास देखील बसणार नाही. गुजरातच्या राजकोटमध्ये २३ वर्षीय मेहुल जोशी याने आपल्या १८ वर्षीय प्रेयसीची परीक्षा घेण्यासाठी एक विचित्र गोष्ट केली. ज्यामुळे आता तो स्वत:च अडचणीत आला आहे. कारण की, गर्लफ्रेंडची परीक्षा घ्यायला गेलेला हा तरुण आता थेट तुरुंगात गेला आहे. दरम्यान, मेहुलला अटक केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मेहुलने स्वत:च्याच अपहरणाचा कट रचून आपल्या प्रेयसीची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. कारण की, त्याला जाणून घ्यायचं होतं की, त्याच्या प्रेयसीचं त्याच्यावर नेमकं किती प्रेम आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मेहुल जोशी हा मंगळवारी आपल्या कार्यालयात जाण्याच्या बहाण्याने घरात निघाला पण त्यानंतर तो अचानक गायब झाला. त्यानंतर त्याने आपल्या मोबाइल फोनमधील सिम कार्ड देखील बदलून टाकलं. नंतर वेगळ्या मोबाइल नंबरवरुन त्याने आपल्या प्रेयसीला धमकीचे अनेक कॉल केले. तिला संशय येऊ नये यासाठी मेहुलने व्हॉईस चेंजर अॅप्लिकेशनचा देखील वापर केला. यावेळी त्याने आपण अपहरणकर्ता असल्याचा दावा करत प्रेयसीकडे ३ लाखांची खंडणी मागितली. यावेळी मेहुलने प्रेयसीला असं सांगितलं की, तिने तीन लाख रुपये घेऊन गांधीधाम येथे यावं. 

प्रियकराचं अपहरण आणि फोनवरील धमकी यामुळे घाबरलेल्या प्रेयसीने थेट पोलिसात धाव घेऊन याप्रकरणी तात्काळ तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी देखील धमकीचे कॉल येणाऱ्या फोन नंबरचं लोकेशन शोधून काढलं. यावेळी मेहुल हा गांधीधाम येथील एका लॉजमध्ये असल्याचं त्यांना समजलं. पण जेव्हा पोलीस लॉजमध्ये पोहचले तेव्हा त्यांना समजलं की, तो तिथून आधीच निघून आहे. त्यानंतर पोलिसांच्या एका टीमने मेहुलला भुजमधील एका बस स्टँडवर अडवलं. त्यानंतर त्याला रितसर अटक देखील करण्यात आली. चौकशीदरम्यान, २३ वर्षीय मेहुलने अशी माहिती दिली की, आपण लिव-इन पार्टनरची परीक्षा घेण्यासाठी स्वत:च्याच अपहरणाचा डाव रचला होता. 

दरम्यान, पोलिसांनी मेहुल जोशीविरोधात भारतीय दंड संहिता (आयपीसी)च्या कलम १८२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सरकारी अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा उद्देशाने चुकीची माहिती देण्यासंबंधित हे कलम आहे. त्यामुळे या कलमानुसारच मेहुलवर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी