Heart Touching Video । मुंबई : भारतातील ईशान्येकडील आसाम राज्य सध्या भीषण पुराच्या तडाख्यात सापडले आहे. पुरामुळे आसाममधील ३३ जिल्ह्यांमधील जनजीवन ठप्प झाले आहे. बहुतांश भागात पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे. यामुळे लाखो लोकांना घरे सोडावी लागली आहेत. तसेच हजारो लोक बेघर होऊन आपल्याला राहण्यासाठी निवारा शोधत आहेत. आसाममध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की ज्या ठिकाणी पूर्वी वाहने धावत असत, आता तिथे बोटी धावत आहेत. दरम्यान आसाममधून एक हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर आला आहे.
अधिक वाचा : शिवसेना मविआतून बाहेर पडणार, राऊतांनी दिली बंडखोरांना ऑफर
सर्वांनीच लहानपणी टीव्हीवर श्री कृष्णाची मालिका पाहिली असेल, त्यातील काही क्षण आजही सर्वांच्या मनामध्ये असतात. त्यातीलच एक भावनिक क्षण म्हणजे श्रीकृष्ण अर्थात भगवान कृष्णाला त्यांचे वडील वासुदेव त्यांच्या टोपलीत ठेवून यमुना नदी पार करतात. सोशल मीडीयावर व्हायरल होत असलेला व्हिडीओही याचाच प्रत्यय देणारा आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना भगवान श्रीकृष्ण आणि वासुदेवांची आठवण येत आहे. व्हिडीओमध्ये एक पिता आपल्या नवजात मुलाला पुराच्या पाण्यात टोपलीत ठेवून घरी आणताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे पुरात अडकलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. (A father reached home carrying the baby in a basket in the flood waters, Watch the video).
हा व्हिडीओ आसाममधील सिलचर येथील आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक वडील आपल्या नवजात मुलाला घरी घेऊन येत आहेत. या दरम्यान पुराचे पाणी घराबाहेर कंबरेपर्यंत भरलेले असते. संततधार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. याच पाण्यात या बापाने आपल्या नवजात बालकाला टोपलीत टाकून घरी आणले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला भगवान श्रीकृष्णाची नक्कीच आठवण येईल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक या व्हिडीओला खूप पसंत करत आहेत.
हा व्हिडीओ अनेकांची मने जिंकत आहे. @SashankGuw नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना यूजरने हा व्हिडिओ सिलचर पुराचा असल्याचे सांगितले. यासोबतच कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे की, व्हिडीओ भगवान कृष्ण आणि त्यांचे वडील वासुदेव यांची आठवण करून देतो.