कोरोनाचा धसका, नवऱ्याने बायकोला बाथरुमध्ये कोंडून ठेवलं! 

पत्नीला कोरोना व्हायरसची लागण झाली असेल या भीतीने एका व्यक्तीने आपल्या पत्नीला बाथरुमध्येच कोंडून ठेवल्याची विचित्र घटना समोर आली आहे.  

afraid of infection with corona virus man locked wife in bathroom
कोरोनाचा धसका, नवऱ्याने बायकोला बाथरुमध्ये कोंडून ठेवलं! (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL

बीजिंग: जगातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये या धोकादायक आणि जीवघेणा संसर्गामुळे प्रचंड भीती पसरली आहे. बरेच लोकांनी या विषाणूची इतकी भीती घेतली आहे की, कोरोना व्हायरसपासून स्वतःचं  रक्षण करण्यासाठी ते विचित्र गोष्टी करत आहेत. अलीकडे अशीच एक बाब समोर आली आहे. जिथे एका नव नवऱ्याने चक्क पत्नीलाच बाथरूममध्ये कोंडून ठेवल्याचं समोर आलं आहे.

हे प्रकरण युरोपमधील लिथुआनिया येथील लिव्हनिअस येथील आहे. जिथे त्या माणसाची पत्नी एका चिनी महिलेला भेटून घरी परत आली होती. डेली मेलच्या वृत्तानुसार, पत्नी आपल्या घरी परत आल्यानंतर तिला  कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असेल असं वाटून तिच्या नवऱ्याने तिला थेट बाथरूममध्ये बंद केले. त्याला वाटले की, पत्नी चिनी महिलेला भेटून आली त्यामुळे कदाचित तिला कोरोना विषाणूच्या संसर्ग झाला असणार.  

अखेर पत्नीने बाथरूममधून पोलिसांना फोन करुन याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घरी येऊन महिलेची सुटका केली.

  1. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाथरूममध्ये बंद: दरम्यान, महिलेच्या नवऱ्याने असा दावा केला आहे की, डॉक्टरांशी बोलल्यानंतरच त्याने पत्नीला बाथरूममध्ये कोंडून ठेवलं. महिलेची तपासणी देखील करण्यात आली आणि तिला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचं स्पष्ट झालं. पत्नीने पतीच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल केलेली नसल्याने पोलिसांनी त्याला अटक केली नाही. सध्या, युरोपमधील लिथुआनियामध्ये कोरोना व्हायरसचा अद्याप कुणीही रुग्ण आढळलेला नाही.
  2. लोकांना वाटतेय चिनी नागरिकांची भीती: कोरोना विषाणूने चीनमध्ये भयंकर रूप धारण केले आहे. आतापर्यंत हजारो जणांचा यात मृत्यू झाला आहे. दरम्यान, त्यामुळे इतर देशातील लोकं हे चिनी नागरिकांशी भेटणं सध्या टाळत आहेत. 
  3. कोरोनाचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम: कोरोना व्हायरसचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर खूप वाईट परिणाम होत आहे. जगभरातून येणारे अनेक नागरिकांनी चीनला न जाणंच पसंत केलं आहे. व्यापारी, सामान्य लोक आणि पर्यटक हे सध्या चीनमध्ये जात नाहीएत. त्यामुळे येथील अनेक दुकानं व कारखान्यांमधील कामही ठप्प झाले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी