तब्बल ६० दिवसांनंतर परतली वरात, नवरीसह सगळे क्वारंटाईन

व्हायरल झालं जी
Updated May 22, 2020 | 18:35 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Baraat return after 60 Days: उत्तरप्रदेशच्या कानपूरहून बिहारला वरात घेऊन गेलेले वराती तब्बल ६० दिवसांनंतर परतले आहेत. वरात घेऊन आल्यानंतर नवरदेव-नवरी सह सर्वच जण क्वारंटाईन.

Bride Marriage
तब्बल ६० दिवसांनंतर परतली वरात, नवरीसह सगळे क्वारंटाईन  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • तब्बल ६० दिवसांनंतर वरात पोहोचली घरी
  • नवरीच्या घरी ६० दिवस राहिल्यानंतर घरी जाण्यासाठी मिळाला अखेर पास
  • सर्व वराती होम क्वारंटाईन, कधीही विसरू न शकणाऱ्या लग्नाची कथा

कानपूर: बिहारच्या बेगूसरायमध्ये नवरीच्या घरी जवळपास ६० दिवस घालवल्यानंतर ११ लोकांची वरात नवरीला घेऊन अखेर उत्तरप्रदेशला परतली आहे. जे कुटुंब गुरुवारी चौबेपूर इथं आपल्या घरी आले, त्या सर्वांना आता १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आलंय. कुटुंबातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्याच्या चौबेपूर भागातील हकीम नगर गावात राहणाऱ्या इम्तियाज यांचा विवाह २१ मार्चला बिहारच्या बेगूसरायच्या खुशबू सोबत झाला. २२ मार्चला जनता कर्फ्यू आणि नंतर देशात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे वरात परतू शकली नव्हती. सर्वांनाच नवरीच्या घरी राहावं लागलं.

नवरदेवाचे वडील महबूब यांनी सांगितलं, ‘आम्ही सर्व हेल्पलाईन नंबर्सवर संपर्क साधला, पण काहीच उपयोग झाला नाही. अशा परिस्थितीत आम्हाला नवरीच्या घरी राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. हे नवरीच्या कुटुंबियांवर अधिकचं ओझं होतं आणि आम्ही जितकं करू शकलो तेव्हढं केलं. अखेर दोन दिवसांपूर्वी आम्ही पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क केला, त्यांनी आम्हाला प्रवासासाठी पास दिला आणि स्थानिक लोकांनी मिनी बसची व्यवस्था केली. अखेर आम्ही १९ मे रोजी बेगूसरायहून निघालो.’

महबूब यांनी सांगितलं की, २० तासांच्या प्रवासादरम्यान हायवेवर लोकांनी वरातीला जेवण आणि पाणी उपलब्ध करून दिलं. त्यांनी पुढे सांगितलं, ‘चौबेपूरचे इंस्पेक्टर विनय तिवारी यांनी आमची भेट घेतली आणि बिल्हौर आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या एका टीमनं आमची कोरोना व्हायरसची चाचणी घेतली. तपासणीसाठी त्यांनी नमूने नेलेत.’

वरातीमधील सर्वांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आलंय. वरातीसोबत लग्नाला गेलेल्या काही ग्रामस्थांनी आम्ही हे लग्न कधीच विसरू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया दिलीय.

वरातीसोबत गेलेल अस्लम म्हणाले, ‘आम्हाला या गोष्टीची अजिबात कल्पना सुद्धा नव्हती की, लग्नासाठी आम्ही जेव्हा आपल्या घरातून निघू तेव्हा परत यायला इतके दिवस लागतील. मात्र आम्ही जितके दिवस नवरीच्या घरी राहिलो, त्यांच्या कुटुंबियांनी आम्हाला खूप प्रेम दिलं, आदर दिला. त्यांची ही वागणूक आम्ही कधीच विसरू शकणार नाही. या दरम्यान स्थानिक लोकांनी नवरीच्या कुटुंबियांना धान्य आणि सामान पुरवठा केला. जेणेकरून आम्हा सर्वांना ते खावू-पिवू घालू शकतील.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी