वाळवीने फस्त केली पाच लाखांची रोकड

'दैव देते आणि कर्म नेते' अशी अवस्था आंध्र प्रदेशमधील बिजली जामलय्या या व्यापाऱ्याची झाली.

andhra pradesh businessman rs 5 lakh kept in trunk eat termites
वाळवीने फस्त केली पाच लाखांची रोकड 

थोडं पण कामाचं

  • वाळवीने फस्त केली पाच लाखांची रोकड
  • घराच्या भिंतीची ओल पेटीतील नोटांपर्यंत पोहोचली
  • मुलांना वाटल्या नोटा

नवी दिल्ली: 'दैव देते आणि कर्म नेते' अशी अवस्था आंध्र प्रदेशमधील बिजली जामलय्या या व्यापाऱ्याची झाली. त्याने बँकेत जमा करण्याऐवजी एका पेटीत ठेवलेली पाच लाख रुपयांची रोख रक्कम वाळवीने फस्त केली. आधी पेटीला नंतर पेटीतील रोख रकमेला वाळवी लागली. वाळवीमुळे सर्व नोटांची वाताहात झाली. ज्यावेळी बिजली जामलय्या यांनी पेटी उघडली त्यावेळी पेटीत नोटांचे विदीर्ण अवस्थेत आढळल्या. नोटांची अवस्था दयनीय झाली होती. या नोटा वापरणे अशक्य असल्यामुळे बिजली जामलय्या यांचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. (andhra pradesh businessman rs 5 lakh kept in trunk eat termites)

घराच्या भिंतीची ओल पेटीतील नोटांपर्यंत पोहोचली

आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यातील मिलावरम भागात राहणारे बिजली जामलय्या हे डुकरांचे खरेदी-विक्री करणारे छोटे व्यापारी आहेत. त्यांनी व्यवसातून झालेल्या उत्पन्नातील पाच लाख रुपये वेगळे काढले आणि एका पेटीत ठेवले होते. बरेच दिवस बिजली जामलय्या यांनी पेटी उघडून बघण्याची तसदी घेतली नाही. घरात ज्या ठिकाणी पेटी ठेवली होती त्या भागातील भिंतीला ओल लागली होती. तिथूनच वाळवी लागण्यास सुरुवात झाली. पण डुकरांच्या व्यापारात गुंतलेल्या बिजली जामलय्या यांनी घराची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले. तसेच ज्या पेटीत पैसे ठेवले होते ती पेटी अन्य सुरक्षित, स्वच्छ आणि कोरड्या जागी ठेवण्याची तसदी बिजली जामलय्या यांनी घेतली नाही. पेटीतल्या पैशांकडे तर बरेच दिवसांत त्यांनी बघितलेच नव्हते. यामुळे भिंतीला लागलेली वाळवी पसरत भिंती शेजारी असलेल्या पेटीपर्यंत पोहोचली आणि पेटीतून आतल्या नोटांपर्यंत पोहोचली हे बिजली जामलय्या यांच्या लक्षात आले नाही.

वाळवीमुळे आर्थिक नुकसान

ज्यावेळी पैशांची गरज होती त्यावेळी बिजली जामलय्या यांनी घरात एका कोपऱ्यात ठेवलेली पेटी उघडली. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. वाळवीमुळे घराच्या भिंतीचे, पेटीचे आणि पेटीतल्या पाच लाख रुपयांचे नुकसान झाले होते. 

रक्कम बँकेत जमा करणे टाळले आणि झाले आर्थिक नुकसान

बिजली जामलय्या यांनी घरासाठी म्हणून पाच लाख रुपये वेगळे काढून ठेवले होते. पण रक्कम बँकेत जमा करण्याऐवजी एका पेटीत ठेवणे आणि ती पेटी ओल लागलेल्या भागात ठेवणे यामुळे बिजली जामलय्या यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. हे नुकसान भरुन काढणे शक्य नसल्यामुळे नव्याने व्यवसायातून पैसा उभा करणे आणि तो बँकेत सुरक्षित ठेवणे हाच पर्याय उरला असल्याचे बिजली जामलय्या यांनी सांगितले. 

मुलांना वाटल्या नोटा

वाळवी लागलेल्या नोटांपैकी काही नोटा झटकून, स्वच्छ करुन बिजली जामलय्या यांनी घराबाहेर खेळणाऱ्या लहान मुलांना वाटून टाकल्या. व्यवहारात या नोटा वापरणे शक्य नसल्यामुळे बिजली जामलय्या यांनी मुलांना खेळण्यासाठी नोटा वाटून टाकल्या. निरागस मुलांना खेळण्यासाठी नवे काही तरी हाती आले म्हणून त्यांनी नोटा हातात घेतल्या. नोटा मिळताच खूष झालेल्या मुलांना बघून स्वतःच्या दुःखातही बिजली जामलय्या यांनी आनंद घेतला. पण नोटा घेऊन रस्त्यावर वावरणाऱ्या मुलांना बघून काही ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मुलांकडे चौकशी केली.

मुलांच्या हातातील नोटांची पोलीस चौकशी

मुलांनी बिजली जामलय्या यांनी पैसे दिल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी बिजली जामलय्या यांच्याकडे चौकशी केली. या चौकशीच्या निमित्ताने वाळवी लागल्यामुळे पाच लाख रुपयांच्या नोटांची वाताहात झाल्याचे उघड झाले. वाळवी लागलेल्या नोटांपैकी काही नोटा तशाच अवस्थेत पेटीत पडून होत्या. या नोटांचे काय करावे हे सुचत नसल्यामुळे बिजली जामलय्या यांनी ती रक्कम तशीच ठेवली होती. 

वाळवी लागलेल्या नोटा बघितल्यानंतर पोलिसांनी थांबवली चौकशी

पोलिसांनी पेटीतील वाळवी लागलेल्या नोटा बघितल्या तेव्हा त्यांचा बिजली जामलय्या यांनी दिलेल्या माहितीवर विश्वास बसला. आधी मुलांच्या हाती बघितलेल्या नोटांची अवस्था फाटकीतुटकी अशीच होती. यामुळे वाळवी लागलेल्या नोटा बघून पोलिसांनी बिजली जामलय्या यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्याची गरज नाही, असा निर्णय घेतला. 

गावात वाळवी लागलेल्या पाच लाख रुपयांची चर्चा

सध्या संपर्ण गावात वाळवी लागलेल्या पाच लाख रुपयांची जोरदार चर्चा आहे. गावात पहिल्यांदाच नोटांना वाळवी लागल्यामुळे गावकऱ्यांसाठी हा चर्चेचा विषय झाला आहे. सोशल मीडियावर वाळवी लागलेल्या नोटांच्या फोटोसह बिजली जामलय्या यांच्याविषयीचे वृत्त व्हायरल होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी