Droupadi Murmu: ओडिशाच्या कलाकाराने द्रौपदी मुर्मू यांना दिल्या अनोख्या शुभेच्छा, काचेच्या बाटलीत काढले लघुचित्र

Droupadi Murmu: मूळच्या ओडिशाच्या असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती होणार असल्याच्या निमित्ताने अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पण यातही ओडिशातील कलाकार एल ईश्वर राव यांनी अगदी अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

Artist from Odisha congratulates Draupadi Murmu in a unique way a miniature picture prepared in a glass bottle
ओडिशाच्या कलाकाराने द्रौपदी मुर्मू यांना दिल्या अनोख्या शुभेच्छा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ओडिशाच्या कलाकाराने द्रौपदी मुर्मू यांना दिल्या अनोख्या शुभेच्छा
  • काचेच्या बाटलीत काढले लघुचित्र
  • राव यांनी तयार केलेल्या बाटलीतल्या लघुचित्राचा फोटो व्हायरल

Droupadi Murmu: द्रौपदी मुर्मू आज (सोमवार २५ जुलै २०२२) भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शपथ घेतील. भारताच्या पहिल्या वनवासी राष्ट्रपती, दुसऱ्या महिला राष्ट्रपती आणि देशाच्या सर्वात लहान वयाच्या राष्ट्रपती होण्याचा मान द्रौपदी मुर्मू यांना मिळणार आहे. मुर्मू ६४ वर्षांच्या आहेत. मूळच्या ओडिशाच्या असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती होणार असल्याच्या निमित्ताने अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पण यातही ओडिशातील कलाकार एल ईश्वर राव यांनी अगदी अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. एल ईश्वर राव यांनी काचेच्या बाटलीत द्रौपदी मुर्मू यांचे लघुचित्र तयार केले आणि राष्ट्रपती होत असल्याबद्दल मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देण्यासाठी एक अनोखी पद्धत वापरल्यामुळे एल ईश्वर राव यांचे अनेकांनी कौतुक केले. राव यांनी तयार केलेल्या बाटलीतल्या लघुचित्राचा फोटो व्हायरल होत आहे. । भारताचे राष्ट्रपती

सोमवारी होणार शपथविधी

द्रौपदी मुर्मू आज (सोमवार २५ जुलै २०२२) भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शपथ घेतील. शपथ ग्रहण करण्याचा सोहळा सकाळी दहा वाजता होईल. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे द्रौपदी मुर्मू यांना शपथ देतील. द्रौपदी मुर्मू यांना शपथ घेतल्यानंतर २१ तोफांची सलामी दिली जाईल. यानंतर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती म्हणून त्यांचे पहिले भाषण करतील. 

शपथ ग्रहण सोहळ्यात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री, विविध राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री, वेगवेगळ्या देशांचे राजदूत, संसद सदस्य, सरकारचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी, सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित असतील. शपथ सोहळा झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद राष्ट्रपती भवन येथे पोहोचणार. राष्ट्रपतींच्या सुरक्षा रक्षकांचा ताफा नव्या राष्ट्रपतींना 'गार्ड ऑफ ऑनर' देणार आणि माजी राष्ट्रपतींना राजशिष्टाचारानुसार निरोप दिला जाणार. 

द्रौपदी मुर्मू २५ जुलै रोजी शपथ घेणाऱ्या दहाव्या राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू या २५ जुलै रोजी शपथ घेणाऱ्या भारताच्या दहाव्या राष्ट्रपती होणार आहेत. भारतात १९७७ पासून नव्या राष्ट्रपतींनी २५ जुलै रोजी शपथ घेण्याची परंपरा निर्माण झाली आहे. याआधी राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून २६ जानेवारी १९५० रोजी शपथ घेतली. भारतात राष्ट्रपतीपदासाठी १९५२ मध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली आणि ही निवडणूक जिंकल्यानंतर राजेंद्र प्रसाद हे मे १९६२ पर्यंत भारताचे राष्ट्रपती होते. 

सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी १३ मे १९६२ रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आणि ते १३ मे १९६७ पर्यंत राष्ट्रपती होते. झाकिर हुसेन आणि फखरुद्दीन अली अहमद हे दोन राष्ट्रपती त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही कारण त्यांचे पदावर असताना निधन झाले. भारताचे सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी २५ जुलै १९७७ रोजी शपथ घेतली, तेव्हापासून २५ जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींना शपथ देण्याची परंपरा निर्माण झाली. 

ज्ञानी झैलसिंह, आर. वेंकटरमण, शंकरदयाळ शर्मा, के.आर. नारायणन, ए.पी.जे. अब्दुल कलाम, प्रतिभा पाटील, प्रणब मुखर्जी आणि रामनाथ कोविंद यांनी २५ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. 

सर्वात लहान वयाच्या राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू या भारतातील सर्वात लहान वयाच्या राष्ट्रपती आहेत. मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. मुर्मू यांना ६४ टक्के मतमूल्य मिळाले. त्यांनी मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली. द्रौपदी मुर्मू या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून सोमवार २५ जुलै २०२२ रोजी शपथ घेणार आहेत. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ६ लाख ७६ हजार ८०३ मतमूल्य मिळाले तर यशवंत सिन्हा यांना ३ लाख ८० हजार १७७ मतमूल्य मिळाले. निवडणूक जिंकून देशातील सर्वात लहान वयाच्या राष्ट्रपती आणि देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान द्रौपदी मुर्मू यांना मिळाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी