Hindu-Muslim: रोजा तोडून त्याने हिंदू मित्रासाठी केले रक्तदान; वाचा मानवता धर्माची कहाणी

व्हायरल झालं जी
Updated May 15, 2019 | 20:17 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Hindu-Muslim: हिंदू मित्राला रक्ताची गरज असल्याचे समजल्यानंतर मुस्लिम मित्र मदतीला धावून आला आहे. पवित्र रमजान महिन्यातील उपवास सोडून त्याने मित्राला रक्त दान केले आहे. आसाममधील मंगलदोयी जिल्ह्यात ही घटना आहे.

Hindu Muslim friendship
हिंदू व्यक्तीला रक्तदान करण्यासाठी मुस्लिम तरुणाने मोडला रोजा   |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • मुस्लिम तरुणाने रक्तदानासाठी मोडला रोजा
  • हिंदू व्यक्तीला रक्तदान करण्यासाठी तोडला रोजा
  • हिंदू-मुस्लिमपेक्षा मानवता धर्मच ठरला श्रेष्ठ

आसाम : देशात लोकसभेच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत. हिंदू-मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करण्यात नेतेमंडळी मग्न आहेत. पण, देशातील सामान्य नागरिक हिंदू-मुस्लिम भेदभावाच्या पलिकडे गेला आहे. राजकारणी मंडळींना प्रत्येक टोपीखाली असलेल्या डोक्याची जात दिसत असली तरी, सामान्यांनी या टोप्या कधीच बाजूला फेकून दिल्या आहेत. देशातील नेतेमंडळींच्या सोशल मीडियावर हिंदू-मुस्लिम वाद घालणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी एक घटना आसाममध्ये घडली आहे. ज्या राज्यात काही वर्षांपूर्वी हिंदू-मुस्लिम दंगली झाल्या आहेत. त्याच राज्यात हे ऐक्याचं फूल उमलल्याचं दिसत आहे. एका हिंदू मित्राला रक्ताची गरज असल्याचे समजल्यानंतर एक मुस्लिम मित्र मदतीला धावून आला आहे. पवित्र रमजान महिन्यातील उपवास सोडून त्याने मित्राला रक्तदान केले आहे. द्वेष भावना भडकवणाऱ्या सोशल मीडियातील मेसेजच्या गर्दीत आज, शेअर होणारा हा मेसेज निश्चितच देशातील प्रत्येकाला सुखावणार आहे.

मानवता धर्मच ठरला श्रेष्ठ

जगभरात सध्या रजमानचे उपवास सुरू आहे. पण, या रमजानच्या पवित्र महिन्यात आसाममध्ये घडलेली एक बंधुभावाची एक पवित्र घटना आनंद देणारी आहे. धर्माच्या पलिकडे माणूसकी नावाची जात आहे, तिच सर्वश्रेष्ठ असल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आसाममधील मंगलदोयी जिल्ह्यातीलही घटना आहे.  पानुल्ला अहमद या २६ वर्षांच्या तरुणाने आपला धर्म विसरून मानवता धर्माचं पालन केलंय. एका हिंदू व्यक्तीला रक्तदान करण्यासाठी पानुल्लाने रोजा तोडला. याबाबत पानुल्ला म्हणाला, ‘सेहरी केल्यानंतर मी आराम करत होतो. त्याचवेळी रूममध्ये असलेला मित्र तपश भगवती खूप चिंतेत असल्याचं दिसलं. त्याला विचारलं की तुला कसली एवढी चिंता लागली आहे. त्यावेळी त्यानं त्याचा सगळा प्रॉब्लेम माझ्याशी शेअर केला. तपश टीम ह्युमेनिटी नावाच्या एका लोकप्रिय ब्लड डोनेशन ग्रुपचा सदस्य आहे. त्याने सांगितले की, एका रुग्णाविषयी कॉल आला होता. ओ-पॉझिटिव्ह ब्लडच्या दोन युनिट रक्ताची खूप गरज असल्याचं त्या ग्रुपमध्ये सांगण्यातं आलं होतं.’

‘माझ्या मैत्रीवर मला गर्व आहे’

अहमद आणि भगवती दोघेही गुवाहटीतील स्वागत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काम करतात. भगवतीकडून माहिती मिळाल्यानंतर अहमद आणि भगवती दोघेही तातडीने हॉस्पिटलमध्ये आले. अहमदने मेडिकल टीमला रोजा सुरू असताना रक्त दान करू शकतो का? असे विचारले. त्यावर मेडिकल टीमने तसे करता येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर अहमदने तातडीने रोजा तोडून गरजवंताला रक्त दान केले. त्यावर भगवतीने आपल्या मैत्रीवर खूप गर्व असल्याचे सांगितले. माझ्या मित्राने धर्माच्या आधी मानवतेची हाक ऐकली, असे भगवती म्हणाला. सध्या अहमदचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी