Bye Bye Sir, Viral Resignation Letter On Social Media : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. आता सोशल मीडियावर एक राजीनाम्याचे पत्र व्हायरल होत आहे. या पत्रात राजीनामा देणाऱ्याने फक्त तीन इंग्रजी शब्द लिहून खाली सही केली आहे.
राजीनामा देणाऱ्या व्यक्तीने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला उद्देशून पत्र लिहिले आहे. व्यावसायिक पत्रांची सुरुवात असते त्याच पद्धतीने या पत्रातही 'डीअर सर' अर्थात प्रिय साहेब.... असा उल्लेख आहे. नंतर पत्रात संदर्भ असे टाइप करून त्या पुढे 'राजीनामा पत्र' असा स्पष्ट उल्लेख केला आहे. या खाली 'बाय बाय सर' असे तीन इंग्रजी शब्द टाइप केले आहे. हे छोटे पण थेट मुद्याला हात घालणारे राजीनामा पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोपे, सुटसुटीत आणि थेट मुद्याला हात घालणारे पत्र अशा स्वरुपाचे मत मांडत काही जणांनी व्हायरल राजीनामा पत्र लिहिणाऱ्याचे कौतुक केले आहे. साधारणपणे राजीनामा देणारी व्यक्ती त्याच्या सहकाऱ्यांविषयी, वरिष्ठांविषयी तसेच ज्या संस्थेत काम केले त्या संस्थेविषयी चार चांगले शब्द लिहिते. ही औपचारिकता करूनच पुढे राजीनामा देत असल्याचे नमूद केले जाते. अनेकदा प्रगतीसाठी राजीनामा देत असल्याचे पत्रात नमूद केले असते. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले पत्र लिहिणाऱ्याने ही औपचारिकता करण्यात वेळ वाया घालविला नसल्याचे दिसते.
व्हायरल पत्र बघून अनेकजण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. कोणी चांगल्या तर कोणी वाईट. व्हायरल झालेल्या पत्राचा संदर्भ घेऊन काहींनी मिम्स सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत.