फॅशनेबल दाढी ठेवल्याने 51000 रुपयांचा दंड, अजब निकालाने तुम्हालाही बसेल धक्का

व्हायरल झालं जी
Updated Apr 06, 2023 | 19:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

fashionable Shaving:सामाजिक सुधारणेच्या नावाखाली एका जातपंचायतीने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयाने तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो. गुजरातमधील बनासकांठा येथे फॅशनेबल दाढी ठेवणाऱ्या पुरुषांना चौधरी समाज पंचायतीने सुमारे 51 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर दुसऱ्या एका प्रकरणात अफूचा वापर करणाऱ्या दोषींना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

fashionable Shaving
फॅशनेबल दाढी ठेवल्याने 51000 रुपयांचा दंड  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • लग्न समारंभात मोबाईलवरून फोटो, व्हिडीओ काढण्यावरही बंदी घालण्याचा निर्णय चौधरी पंचायतीने घेतला
  • अंजना चौधरी समाजाच्या पंचायतीने मृत्यूनंतर अफूची प्रथा बंद करण्याचा निर्णय
  • सामूहिक विवाहाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे

fashionable Shaving: गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील धानेरा तालुक्यातील एका गावात चौधरी समाजाने सामाजिक सुधारणेच्या नावाखाली एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अंजना चौधरी समाज पंचायतीने फॅशनेबल दाढी पुरुषांना 51 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर अफूचा वापर करताना आढळून आल्यास 1 लाख रुपयांचा दंड सुनावला आहे. चौधरी समाज पंचायतीने सुनावलेल्या निर्णयाचं सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

विवाह किंवा मोठ्या समारंभात मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. आता अंजना चौधरी समाज पंचायतीने लग्न समारंभातील खर्चावर अंकूश बसवण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. लग्न-विवाहात कमी खर्चाची मर्यादा देखील आखून देण्यात आली आहे. इतकंच नाही तर आता वाढदिवस आणि लग्न समारंभातील डीजे संस्कृती संपुष्ठात आणण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय सामूहिक विवाहाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. बनासकांठामध्ये चौधरी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. धानेरा तालुक्यातील 54 गावांसाठी अंजना चौधरी समाजाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

अफूची परंपरा बंद...

अंजना चौधरी समाजाच्या पंचायतीने मृत्यूनंतर अफूची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेली अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू होती. आता अफूचा वापर सुरू केल्यास एक लाखाच्या दंडाची तरतूद देखील करण्यात आली आहे. तसेच लग्न समारंभात फटाखे कमी असावे, लग्नपत्रिका साधी असावी, याशिवाय विवाह सोहळ्यात पाहुण्यांना जेवण वाढण्यासाठी बाहेरून भाड्याने लोक आणणार नाहीत. त्याचबरोबर मुलीच्या लग्नात 51 हजार रुपयांहून जास्त वस्तूंच्या वितरणावर देखील अंजना चौधरी समाज पंचायतीने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाईलवरून फोटो काढता येणार नाही

लग्न समारंभात मोबाईलवरून फोटो, व्हिडीओ काढण्यावरही बंदी घालण्याचा निर्णय चौधरी पंचायतीने घेतला आहे. धानेरा तालुक्यातील एकूण 54 गावांतील अंजना चौधरी समाजाने सामाजिक सुधारणेसाठी 23 नियम निश्चित केले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी