'जर मला माझ्या नवऱ्याला किस करायचे असेल तर' : मास्क न वापरणाऱ्या महिलेचे दिल्ली पोलिसांसोबत गैरवर्तन, व्हिडिओ

व्हायरल झालं जी
Updated Apr 19, 2021 | 13:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

शहरात मास्क न वापरता फिरत असल्याबद्दल थांबवल्यावर हे जोडपे दिल्ली पोलिसांशी हमरीतुमरी आले होते. पोलिस कर्मचाऱ्यांशी त्यांनी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.

Couple misbehave with Delhi Police, FIR registered
जोडप्याचे दिल्ली पोलिसांशी गैरवर्तन, गुन्हा नोंदवला 

थोडं पण कामाचं

  • दिल्लीत एका दिवसात २५,४६२ कोरोना रुग्णांची नोंद
  • १६१ कोरोना मृत्यू
  • जोडप्याच्या गैरवर्तनाचा व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेमुळे लागू करण्यात आलेल्या विकेंड कर्फ्यूमध्ये दिल्ली पोलिसांच्या काही कर्मचाऱ्यांनी एका महिलेची कार, मास्क न घातल्यामुळे थांबवली असता या महिलेने पोलिसांशी गैरवर्तन करत बाचाबाची केली. त्यानंतर या महिलेला पोलिस स्टेशनमध्ये नेऊन तिच्यावर एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

या जोडप्याचे नाव आभा आणि पंकज असे असून दोघेही दिल्लीच्या पटेल नगर भागातील रहिवासी आहेत. मास्क न घालत्यामुळे पोलिसांनी या जोडप्याला अडवले असता, या दोघांनीही पोलिसांवर आरडोओरडा करत बाचाबाची केली. याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ दिल्ली पोलिसांनीच शेअर केला आहे. या व्हिडिओत ही महिला पोलिसांना, 'कोरोनाच्या नावावर तुम्ही लोक काय नाटकं करत आहात?' असे बोलताना दिसते आहे. 

महिलेचा उद्धटपणा

या महिलेने पोलिसांना दबावात घेण्याचादेखील प्रयत्न केला. सुरूवातीला तिने मी युपीएससी परीक्षा पास झाली आहे असे सांगितले. त्यानंतर तिने आपण एका सब-इन्स्पेक्टरची मुलगी असल्याचेही पोलिसांना सांगितले. दिल्ली पोलिसांच्या एका कर्मचाऱ्याने ही माहिती दिली आहे. तुम्ही जर युपीएसएसी परीक्षा पास झाला आहात तर तुम्ही अधिक जबाबदारीने वर्तणूक केली पाहिजे, असे दिल्ली पोलिसांच्या एका कर्मचाऱ्याने या महिलेला सांगितले होते. त्यानंतर या जोडप्यात आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती.

उच्च न्यायलयाच्या सूचना


यानंतर या दोघांना दिल्लीच्या दर्या गंज पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले आणि त्यांच्या विरोधात आयपीसीच्या कलमांअंतर्गत तक्रार नोंदवण्यात आली. ७ एप्रिलला दिल्ली उच्च न्यायालयाने यासंदर्भात एक महत्त्वाची सूचना केली आहे. एखादी व्यक्ती एकट्याने जरी खासगी वाहनातून प्रवास करत असेल तरीदेखील मास्कचा वापर करणे बंधनकार आहे. त्या कारला सार्वजनिक ठिकाणच समजले जाईल, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे.

दिल्लीत विकेंड कर्फ्यू


गुरूवारी दिल्ली सरकारने विकेंड कर्फ्यूची घोषणा केली होती. दिल्लीत कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेमुळे संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होते आहे. त्यामुळेच कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी आणि कोविड-१९ची साखळी तोडण्यासाठी दिल्ली सरकारने ३० एप्रिलपर्यत मॉल, जिम आणि ऑडिटोरिअम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्लीत कोरोनाचा मोठा संसर्ग


दिल्लीत कोविड-१९चा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिल्लीने एका दिवसातील दिल्लीचीच आतापर्यतची सर्वाधिक रुग्ण संख्या नोंदवली आहे. दिल्लीमध्ये २५,४६२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर मागील चोवीस तासात १६१ कोविड-१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाची दुसरी लाट


देशभर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उग्र रुप धारण केले आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोना संसर्ग वेगाने वाढतो आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने मोठी वाढ होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण पडतो आहे. कोरोनाच्या मोठ्या रुग्ण संख्येमुळे हॉस्पिटलमध्ये बेड अपुरे पडत आहेत. तर औषधे आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यातही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हवालदिल आणि चिंताग्रस्त झाले आहेत. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी