लकवाग्रस्त काश्मिरी मुलाला जेवू घालतानाचा CRPF जवानाचा व्हिडिओ व्हायरल

व्हायरल झालं जी
Updated May 15, 2019 | 15:51 IST | टाइम्स नाऊ हिंदी

CRPF: जवानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सीआरपीएफ जवान आपल्या डब्यातील जेवण एका लहान मुलाला खाऊ घालत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला खूप पसंती मिळतेय.

CRPF Havaldar Iqbal Singh
सीआरपीएफ जवानाचा व्हिडिओ व्हायरल  |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली: श्रीनगरमध्ये तैनात असलेला सीआरपीएफ जवान एका लहान मुलाला आपल्या डब्यातील जेवण खाऊ घालत आहे. लहान मुलाला जेवण भरवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इकबाल सिंह असं या सीआरपीएफ हवालदाराचं नाव आहे. १३ मे चा हा व्हिडिओ असून तो सोशल मीडियावर पसंत केला जातोय. या व्हिडिओमुळे इकबाल सिंह यांच्या कामाची सर्वत्र स्तुती होत आहे. तसंच त्यांना पोलीस महासंचालक म्हणजे डीजी यांनीही प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे.

इकबाल सिंह हे सीआरपीएफच्या ४९ बटालियनचे ड्रायव्हर आहेत. ते पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या वेळी सुद्धा सीआरपीएफच्या ताफ्यातील एक वाहन चालवत होते. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, इकबाल सिंह एका बंद दुकानासमोर पायऱ्यांवर बसलेल्या एका लहान मुलाला जेवू घालत आहेत. इकबाल सिंह हे श्रीनगरच्या नवाकदल येथे ड्यूटीवर होते. या घटनेबाबत बोलतांना त्यांनी सांगितलं की, ‘मी जेव्हा जेवण करायला बसलो, तर तिथं समोर त्यांना एक मुलगा दिसला जो उपाशी वाटत होता. मग त्याला मी जेवण दिलं, पण त्याला ते खाता येत नव्हतं, म्हणून मग मी आपल्या हातानं त्याला भरवलं आणि पाणी पाजलं.’ तेव्हाच कुणीतरी हा व्हिडिओ बनवला.

 

 

श्रीनगर सेक्टर सीआरपीएफनं हा व्हिडिओ ट्विट करत लिहिलं, ‘माणुसकी ही सर्व धर्मांपेक्षा मोठी आहे. ४९ बटालियन श्रीनगर सेक्टरचे सीआरपीएफचे हेड कॉन्स्टेबल ड्रायव्हर इकबाल सिंह यांनी ड्यूटीवर असतांना एका लकवा मारलेल्या काश्मिरी मुलाला जेवू घातलं. शेवटी त्याला पाणीही विचारलं आणि पाजलं. शूरवीरपणा आणि करुणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.’

या व्हिडिओवर सीआरपीएफनंही आपली प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी लिहिलं, ‘आता असाही एक धर्म असावा, ज्यात माणसाला माणूस बनवलं जातं.’

व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनीही प्रतिक्रिया दिलीय. त्या म्हणतात, “पोलिसांच्या या ‘दया आणि माणुसकीच्या भावनेला’ मी सलाम करत त्यांच्या या कामाचं कौतुक करते. काश्मीरच्या जवानांना नेहमीच एका नजरेनं बघितलं जातं. मात्र, या व्यक्तीच्या दया आणि माणुसकीच्या भावनेचा मी आदर करते.”

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी