इंटरव्यूहमध्ये iPhone न ओळखल्यामुळे नोकरी मिळाली नाही, म्हणून सुरू केली स्वत:चीच कंपनी

व्हायरल झालं जी
Updated Apr 13, 2021 | 18:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

जर एखादी व्यक्ती नोकरीच्या शोधात असेल आणि त्या व्यक्तीला मुलाखतीत हा मोबाईल कोणत्या कंपनीचा आहे? असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर माहित नसल्यावर ती नोकरी न मिळाल्यास त्या व्यक्तीला काय वाटेल.

Dilkhush kumar started his own company
आयफोन न ओळखल्याने गमावली नोकरी  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • आयफोन न ओळखल्याने नोकरी गमावली
  • बिहारच्या गावातील एक तरुण
  • जिद्दीने सुरू केली स्वत:चीच कंपनी

नवी दिल्ली : या जगात असे अनेक लोक असतात जे आपल्या हिंमतीने आणि जिद्दीने यशाच्या शिखरावर पोचतात. आपल्या सर्वांसाठीच ते प्रेरणादायी असते. अशीच एक कहाणी आहे दिलखूष कुमार यांची. दिलखूष कुमार यांची बिहारमधील मधेपुरा येथे ऑनलाईन टॅक्सी उपलब्ध करून देणारी कंपनी आहे. या कंपनीचे नाव Aryago असे असून ते या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आहेत. अलीकडेच त्यांनी आपल्या आयुष्यातील एक अनुभव शेअर केला आहे. तो खूपच व्हायरल होतो आहे.

सोशल मीडियावर दिलखूष यांची कहाणी वेगाने व्हायरल होते आहे. त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे. 

दिलखूष कुमार यांची कहाणी


दिलखूष कुमार आपली कहाणी सांगतात.
आजपासून जवळपास १० वर्षांपूर्वी मला सहरसा येथे नोकरी मिळाली होती. माझे वडील मिनी बस चालवायचे. त्यांचा पगार ४,५०० रुपये होता. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती फारच बेताची होती. त्यामुळे मला नोकरीची फारच गरज होती. पाटण्याच्या एका कंपनीने अर्ज मागवले होते. मीदेखील त्यासाठी अर्ज केले. ५ ऑगस्टला पाटण्याला मला इंटरव्यूहसाठी बोलावण्यात आले. निवड झाल्यास तुम्हाला २,४०० प्रति महिना पगार मिळेल असे मला सांगण्यात आले. मी रात्रंदिवस त्याच नोकरीचा विचार करत होतो. त्यादिवशी मी पाटण्याला जाण्यासाठी निघालो तर बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. आमच्या गावापासून स्टेशन १० किमी अंतरावर आहे. मी प्लॅस्टिकने सगळे अंग झाकून घेतले आणि स्टेशनवर पोचलो. त्यानंतर ट्रेन पकडून पाटण्याला पोचलो. पाटण्यातसुद्धा पाऊस पडत होता. 

अॅपलचा फोन पहिल्यांदाच पाहिला


मी पहिल्यांदाच पाटण्याला गेलो होतो. पत्ता विचारत इंटरव्यूहच्या ठिकाणी पोचलो. माझ्याआधी १० ते १५ तरुण हजर होते. माझी वेळ आल्यानंतर मी आत गेलो. तिथे ३ साहेब आणि २ मॅडम बसलेल्या होत्या. माझ्या बोलण्यावरून त्यांना मी खेड्यातून आल्याचे लक्षात आले. त्यांनी आपला मोबाईल फोन उचलला आणि मला दाखवत म्हणाले की याच्या कंपनीचे नाव सांग. मी त्या कंपनीचा लोगो पहिल्यांदाच पाहत होतो. त्यामुळे मी साहेबांना सांगितले की मला माहित नाही. त्यावर ते म्हणाले की हा आयफोन असून (Iphone) अॅपल (Apple)कंपनीचा फोन आहे. 

मला उत्तर देता आले नाही म्हणून मला ती नोकरी मिळाली नाही. मी गावी परतलो आणि माझ्या वडिलांच्याप्रमाणेच ड्रायव्हरचे काम करू लागलो. त्यादिवशी मला त्यांनी ज्या पद्धतीने तो आयफोन दाखवला ते अजून माझ्याडोळ्यासमोर फिरत होते. मात्र आज माझ्याकडेच आयफोन आहे त्यामुळे कदाचित यानंतर आयफोन माझ्या डोळ्यासमोर फिरणार नाही. 

Aryagoची सुरूवात


आज दिलखूष यांची स्वत:चीच कंपनी  आहे. ते मुंबई आणि दिल्लीतील ओला-ऊबेरप्रमाणेच सेवा पुरवत आहेत. दिलखूष यांनी आपल्या गावापासून कंपनीची सुरूवात केली. तिचे नाव Aryago असे आहे. कंपनीची सुरूवात त्यांनी २०१६मध्ये केली होती. त्यांच्यामुळे इतरांनादेखील प्रेरणा मिळते आहे. जर त्या दिवशी त्यांना ती नोकरी मिळाली असती तर आयुष्यभर ते एक सर्वसामान्य कर्मचारी बनून राहिले असते. मात्र आज दिलखूष कुमार एका कंपनीचे मालक आहेत आणि इतरांनादेखील रोजगार पुरवत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी