माजी आमदाराला देवाच्या चरणी आला मृत्यू

Ex-Congress MLA Vinod Daga Dies Of Cardiac Arrest मध्य प्रदेशमधील बैतूल येथे एक घटना घडली. या घटनेची चर्चा सलग दोन दिवसांपासून होत आहे. ही घटनाच चक्रावून टाकणारी आहे.

Ex-Congress MLA Vinod Daga Dies Of Cardiac Arrest
माजी आमदाराला देवाच्या चरणी आला मृत्यू 

थोडं पण कामाचं

  • माजी आमदाराला देवाच्या चरणी आला मृत्यू
  • मंदिरात दररोज पूजा करायचे काँग्रेसचे माजी आमदार विनोद डागा
  • भाग्यवान होते म्हणून असा मृत्यू आला, स्थानिक पुजाऱ्याचे मत

नवी दिल्ली: मध्य प्रदेशमधील बैतूल येथे एक घटना घडली. या घटनेची चर्चा सलग दोन दिवसांपासून होत आहे. ही घटनाच चक्रावून टाकणारी आहे. बैतूलमध्ये काँग्रेसचे माजी आमदार आणि उद्योगपती विनोद डागा यांना देवाच्या चरणी मृत्यू आला. (Ex-Congress MLA Vinod Daga Dies Of Cardiac Arrest; Incident Caught On Temple CCTV)

मंदिरात दररोज पूजा करायचे काँग्रेसचे माजी आमदार विनोद डागा

नेहमीच्या सवयीला अनुसरुन विनोद डागा गुरुवारी १२ नोव्हेंबर रोजी घराजवळच्या जैन मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तिथे देवाचे दर्शन घेतल्यानंतर हात जोडून त्यांनी नमस्कार केला. देवाला पाया पडायचे म्हणून नेहमीच्या सवयीने विनोद डागा कंबरेत वाकले. त्यांनी डोके शांतपणे देवाच्या मूर्तीच्या चरणी ठेवले. डोके देवाच्या चरणी ठेवले असताना विनोद डागा यांना हृदयविकाराचा जबर धक्का आला आणि त्यांनी लगेच प्राण सोडले. ही घटना बैतूलच्या दादावाडी येथील जैन मंदिरात घडली. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली. हा चक्रावून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी विनोद डागा यांना मुक्ती मिळाली, असे मत व्यक्त केले. 

देवाच्या चरणी आला मृत्यू

विनोद डागा अनेक वर्षांपासून दररोज दादावाडी येथील जैन मंदिरात सकाळी येत होते. देवाचे दर्शन घेणे, मग प्रदक्षिणा घालणे नंतर पुन्हा देवदर्शन करणे आणि सर्वात शेवटी देवाच्या चरणी डोके ठेवून थोडा वेळ तिथे शांत उभे राहणे असे विनोद डागा दररोज करत होते. अनेक वर्षांपासूनच्या या नित्यक्रमाप्रमाणेच गुरुवारी १२ नोव्हेंबर रोजी विनोद डागा यांनी दादावाडीच्या जैन मंदिरात येऊन देवदर्शन घेतले. प्रदक्षिणा झाल्यानंतर देवाच्या चरणी त्यांनी वाकून शांतपणे डोके ठेवले. यानंतर थोड्यावेळाने ते पडले. हा प्रकार लक्षात येताच मंदिराच्या आवारात असलेल्या एका मुलीने पुजाऱ्याला माहिती दिली. पुजारी घटनास्थळी आले त्यांना डागा पडल्याचे दिसले. तातडीने विनोद डागा यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन डागा यांचे निधन झाल्याचे सांगितले.

भाग्यवान होते म्हणून असा मृत्यू आला, स्थानिक पुजाऱ्याचे मत

विनोद डागा मध्य प्रदेशमधील पोटनिवडणुकीतल्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस इतर नेत्यांसह भोपाळमध्ये होते. तिथून ते बुधवारी रात्री बैतूलला परतले. ते नित्यक्रमाप्रमाणे गुरुवारी १२ नोव्हेंबर रोजी मंदिरात आले आणि देवाच्या चरणी त्यांना मृत्यू आला. विनोद डागा भाग्यवान होते म्हणून त्यांना देवाच्या चरणी मृत्यू आला. त्यांना दादा गुरुंचे सान्निध्य लाभले, असे मंदिराचे पुजारी ओम प्रकाश त्रिपाठी म्हणाले. सध्या संपूर्ण बैतूलमध्ये याच घटनेची चर्चा सुरू आहे. 

काँग्रेसने व्यक्त केला शोक

बैतूलमध्ये काँग्रेसचे माजी आमदार आणि उद्योगपती विनोद डागा यांना देवाच्या चरणी मृत्यू आला. या घटनेची माहिती मिळताच मध्य प्रदेश काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी शोक व्यक्त केला. ही घटना आकस्मिक आणि चक्रावून टाकणारी आहे. पण डागा यांच्या निधनाने काँग्रेसचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी