फॅक्ट चेक: भारतात २५ सप्टेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन

Fact Check : Lockdown in India from 25th September भारतात २५ सप्टेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन होणार अशा स्वरुपाची बातमी व्हायरल होत आहे. ही बातमी खरी आहे की खोटी याचा तपास करणारा फॅक्ट चेक रिपोर्ट...

fact check
फॅक्ट चेक: भारतात २५ सप्टेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन 

थोडं पण कामाचं

  • फॅक्ट चेक: भारतात २५ सप्टेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन
  • राष्ट्रीय आपत्ती निवारण व्यवस्थापन प्राधिकरणाने २५ सप्टेंबरपासून लॉकडाऊन करण्याची शिफारस केलेली नाही
  • भारतात २५ सप्टेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन ही अफवा

नवी दिल्ली: कोरोना संकटावर (Corona Crisis) मात करण्यासाठी भारतात (India) २५ सप्टेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) होणार अशा स्वरुपाची बातमी (NEWS) व्हायरल (Viral) होत आहे. ही बातमी खरी आहे की खोटी हे तपासण्यासाठी तसेच नागरिकांच्या मनातले संभ्रम दूर करण्यासाठी पीआयबी या सरकारी संस्थेने पुढाकार घेतला. पीआयबी अर्थात प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (Press Information Bureau) या केंद्र सरकारच्या (Government of India) अखत्यारित काम करणाऱ्या संस्थेने व्हायरल बातमीच्या सत्यतेची पडताळणी (Fact Check) केली आणि अहवाल दिला. (Fact Check - Lockdown in India from 25th September)

भारताच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण व्यवस्थापन प्राधिकरण अर्थात नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी (National Disaster Management Authority) या संस्थेने लॉकडाऊन करण्याचा सल्ला केंद्र सरकारला दिला, अशा स्वरुपाचे वृत्त व्हायरल होत आहे. प्रत्यक्षात राष्ट्रीय आपत्ती निवारण व्यवस्थापन प्राधिकरणाने २५ सप्टेंबरपासून लॉकडाऊन करण्याची शिफारस केलेली नाही. 

जगात सर्वाधिक कोरोना रिकव्हरी भारतात होत आहे. कोरोनाची बाधा झालेल्या देशांच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला भारत रिकव्हरीच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. भारतामध्ये आतापर्यंत ५४ लाख १८ हजार ६८१ जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी ४३ लाख १४ हजार ६०६ जण कोरोनामुक्त झाले. देशात कोरोनामुळे ८६ हजार ९२६ मृत्यू झाले. सध्या भारतात १० लाख १७ हजार १४९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा कोरोना रिकव्हरी रेट ७९.६७ टक्के आहे.

या उलट अमेरिकेत आतापर्यंत ६९ लाख ८३ हजार १३६ जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी ४२ लाख २७ हजार ४४७ जण कोरोनामुक्त झाले. तसेच ब्राझिलमध्ये ४५ लाख २८ हजार ३४७ जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी ३८ लाख २० हजार ९५ जण कोरोनामुक्त झाले. तर रशियामध्ये ११ लाख ३ हजार ३९९ जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी ९ लाख ९ हजार ३५७ जण कोरोनामुक्त झाले.

भारतात कोरोनाची बाधा झालेले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. याच कारणामुळे भारतात पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत विचार होत असल्याचे वृत्त असत्य आणि दिशाभूल करणारे आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण व्यवस्थापन प्राधिकरणाने २५ सप्टेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन करण्याची शिफारस केलेली नाही.

भारतात दररोज ७.६७ टक्के नवे कोरोना रुग्ण (India's corona positivity rate) आढळत आहेत. देशाचा कोरोना मृत्यू दर (India's corona death rate) १.६० टक्के आणि रिकव्हरी दर (India's recovery rate) ७९.६७ टक्के आहे.

कोरोना संकटावर मात करण्यासाठी पुढे करायच्या उपायांवर चर्चा करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी २३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामीळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत. 

या वातावरणात दिलासा देणारी अजून एक बाब आहे. संपूर्ण जग कोरोनाला (corona virus) प्रतिबंध करू शकेल अशा सक्षम लशीच्या (vaccine) आगमनाकडे डोळे लावून बसले आहे. सुदैवाने भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिन या लशीचे प्रयोग यशस्वी होत आहेत. 

भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (Bharat Biotech International Limited - BBIL), आयसीएमआर (Indian Council of Medical Research - ICMR), एनआयव्ही (National Institute of Virology - NIV) आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय संयुक्तपणे कोव्हॅक्सिन विकसित करत आहेत. या लशीच्या प्रयोगासाठी केंद्रीय सशस्त्र बल मेडिकल कॉलेजमध्ये २० माकडांवर प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाला. माकडांच्या शरीरात कोरोनावर मात करण्यासाठी अँटीबॉडीज तयार झाल्या. 

ऑक्सफर्ड विद्यापीठाची प्रयोगशाळा (Oxford University Lab), पुण्याची सीरम कंपनी (Serum Institute of India) आणि अॅस्ट्राझेंका (Astrazeneca) संयुक्तपणे कोरोनावर मात करण्यासाठी लशीची निर्मिती करत आहेत. 

भारत बायोटेक आणि सीरमसह देशातील सात कंपन्या कोरोनावर मात करण्यासाठी लस करण्याकरिता संशोधन करत आहेत. प्रत्येक संस्थेचे संशोधन वेगवेगळ्या टप्प्यावर असले तरी प्रगतीपथावर आहे. भारतात कोरोना रिकव्हरी रेट वाढत असताना लस आल्यास संकटावर मात करणे आणखी सोपे होईल, अशी आशा आहे. ताज्या अहवालानुसार सीरम आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांचे प्रयोग यशस्वी झाल्यास या दोन्ही कंपन्या २०२१च्या पहिल्या तिमाहीत लस बाजारात आणण्याची शक्यता आहे.

निष्कर्ष - भारतात २५ सप्टेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन ही अफवा आहे. कृपया अफवेवर विश्वास ठेवू नका.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी