Helping Motivation : रस्त्यावर मजुरी करणाऱ्या एका कामगाराच्या (worker) मदतीला (Help) धावून आलेल्या मुलींच्या बापाची (Father of two daughters) गोष्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Viral on social media) होत आहे. आपण नेहमीच रस्त्याने जाताना अनेकजण संघर्ष करत असल्याचं पाहतो. एखादी वस्तू ढकलताना, उचलताना किंवा खेचून नेताना त्यांना पूर्ण ताकद लावावी लागते आणि काम पूर्ण होईपर्यंत अक्षरशः त्यांची दमछाक होते. अनेकांना तर ओझं पेलवतही नसतं, मात्र पोट भरण्यासाठी कसंबसं ते हेे काम करत असतात आणि आपली गुजराण करत असतात. रस्त्याने जाताना दिसणाऱ्या अशा अनेकांना मदत करावी, असा विचारही अनेकदा आपल्या मनात येत नाही. आपण त्यांचे कष्ट पाहतो, हळहळतो आणि पुढे निघून जातो. मात्र अशा परिस्थितीत आपण नेमकं कसं वागायला हवं, काय करायला हवं, याचा धडाच एका व्यक्तीने घालून दिला आहे.
If we help each other a little in life, life will be easier for everyone.❤️ pic.twitter.com/FbyNAE1Y2Z — Awanish Sharan (@AwanishSharan) July 25, 2022
आपल्या दोन मुलींना घेऊन फिरायला आलेला एक बाप या व्हिडिओत दिसतो. त्याने आपल्या हातात दोन आईस्क्रीम विकत घेतले आहेत आणि मुलींना ते देण्याच्या तयारीत तो असल्याचं दिसतं. तेवढ्यात रस्त्यावरून कुठलेसे डबे भरलेली एक हातगाडी खेचत नेणारा मजूर दिसतो. त्याच्या हातगाडीत माल भरलेला आहे आणि ते खेचताना त्याला फारच कष्ट घ्यावे लागत असल्याचं दिसतं. पूर्ण ताकद लावून अगदी जिवानिशी तो हातगाडी खेचतो आहे आणि ती पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याला गाडी ओढण्यासाठी इतकी ताकद लावावी लागते की तो अक्षरशः कंबरेतून खाली वाकतो आणि सगळा जोर एकवटून गाडी ओढतो.
या तरुण मजुराचे हे कष्ट पाहून त्याला मदत केली पाहिजे, असं दोन मुलींसोबत आलेल्या त्यांच्या वडिलांना वाटतं. आपल्या हातातील आईस्क्रीम ते मुलींना देतात आणि लगेचच त्या हातगाडीवाल्या मजुराच्या मदतीला धावतात. पुढून हातगाडी ओढणाऱ्या मजुराच्या पाठिमागे ते जातात आणि मागून त्याला गाडी ढकलायला मदत करतात. आपला भार अचानक हलका कसा झाला, याचं आश्चर्य वाटून तो मजूर मागे वळून पाहतो. तेव्हा कुणीतरी एकजण देवदूतासारखा आपल्या मदतीला आल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. त्याच्या खांद्यावरचा भार काहीसा हलका होतो आणि अधिक उत्साहाने तो आपलं काम पुढे सुरू ठेवतो.
अधिक वाचा - Brainy Farmer : शास्त्रज्ञापेक्षाही हुशार शेतकरी, पक्ष्यांना हाकलण्यासाठी केला जबराट जुगाड, पाहा VIDEO
एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ याचा नेमका अर्थ काय, हे या व्हिडिओतून समजतं. IAS अधिकारी अवनिश शरण यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. जर एकमेकांना आपण थोडीशी मदत केली, तर सगळ्याचंच जगणं सोपं होईल, असा संदेश त्यांनी या व्हिडिओसोबत ट्विट केला आहे. त्यावर युजर्सनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. या वडिलांनी आपल्या मुलींसमोर आपल्या कृतीतूनच आदर्श निर्माण केल्याची प्रतिक्रिया सध्या सर्वांनाच आवडते आहे.